नागपूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नागपूर जिल्ह्यातून आ. विकास ठाकरे व आ. राजू पारवे हे देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ठाकरे व पारवे या दोन्ही आमदारांनी आपण काँग्रेसचे आमदार असून आपला अशोक चव्हाण यांच्याशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट केले.
आ. विकास ठाकरे म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. काँग्रेस पक्षात आपण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काम केले आहे. पण आपल्याशी चव्हाण यांनी कुठलाही संपर्क साधलेला नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे, असेही आ. ठाकरे यांनी स्पष्ट केले.आ. राजू पारवे म्हणाले, मी काँग्रेसचा आमदार आहे. अशोक चव्हाण यांच्याशी माझे कुठलेही बोलणे झालेले नाही, असे सांगत आ. पारवे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
माजी मंत्री आ. नितीन राऊत व माजी मंत्री आ. सुनील केदार यांनी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खूपसला
माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले, मी अशोक चव्हाण यांचा कार्यकर्ता नाही. जे कार्यकर्ते ते असतील ते जातील. आमचे नेते राहुल गांधी, मलिल्कार्जून खरगे आहेत. आम्हाला एवढ्या सहज कुणी विकत घेऊ शकत नाही. चव्हाण यांना काँग्रेसने भरभरून दिले आहे. कमी वयात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष केले. अ.भा. काँग्रेस समितीचे पद दिले. त्यांच्या म्हणण्यावर अनेकांना लोकसभा, विधानसभेच्या तिकीटा दिल्या. अनेकांना विधान परिषदेवर नेमले. नुकतेच लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या केंद्रीय समितीतही स्थान दिले. एवढे सगळे देऊनही चव्हाण यांनी पक्ष नेतृत्त्वाच्या पाठीत खंजीर खुपसला. हे पाहून वेदना होतात. पक्षावर नाराज असणे हा वेगळा भाग आहे पण असा दगा देणे न पचणारी गोष्ट आहे. जनता चव्हाण यांच्यासह पक्ष सोडणाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार का ?नितीन राऊत : नाही
सुनील केदार : नाही
विकास ठाकरे : नाही
राजू पारवे : नाही