विकास ठाकरेंनी मांडला कामाचा अन् बंडखोरांचा लेखाजोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:52 PM2018-03-06T23:52:55+5:302018-03-06T23:53:07+5:30
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी दिल्ली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी शहर काँग्रेसने चार वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसेच चतुर्वेदी यांच्यासह समर्थकांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांचा अहवालही सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह समर्थकांनी मंगळवारी दिल्ली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी शहर काँग्रेसने चार वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसेच चतुर्वेदी यांच्यासह समर्थकांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांचा अहवालही सादर केला.
ठाकरे यांच्यासोबत विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी महापौर नरेश गावंडे, प्रशांत धवड, माजी उपमहापौर अण्णाजी राऊत, नगरसेवक संदीप सहारे, हरीश ग्वालबंसी, रमेश पुणेकर, नितीश ग्वालबंसी, विवेक निकोसे, आसीफ शेख, देवा उसरे, मनोज सांगोळे, पंकज लोणारे, अशरफ खान, इरफान कोमर, राजेश कुंभलकर, रवी घाडगे, गजराज हटेवार, जयंत लुटे, दीपक वानखेडे, राजू कमनानी, प्रमोद ठाकूर, प्रवीण गवरे, प्रवीण सांदेकर, शेख हुसैन, रमण पैगवार, नितीन साठवणे, इर्शाद अली, वासुदेव ढोके, प्रशांत पाटील, किशोर उमाठे, प्रसन्ना जिचकार यांनी नेत्यांची भेट घेतली.
या भेटीत ठाकरे यांनी नेत्यांना सांगितले की,राज्यात, नागपुरात भाजपाची सत्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे भाजपा नेते आहेत. असे असतानाही गेली चार वर्षे आपण काँग्रेस जिवंंत ठेवली. दुसऱ्या फळीतील हेच कार्यकर्ते पक्षासाठी झटले. या काळात तीन मोठ्या सभा, विधानभवनावर दोन मोर्चे काढण्यात आले. ३० आंदोलने केली. आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाले तर दुसरीकडे पक्षाची पदे व सत्ता भोगलेल्या काही नेत्यांनी चार वर्षात भाजपाच्या विरोधात एक शब्दही काढलेला नाही. त्यांनी पडद्यामागून भाजपा नेत्यांशी हातमिळवणी करून काँग्रेस दुबळी करण्याची सुपारी घेतली आहे. याचे पुरावेही ठाकरे यांनी सादर केले.
ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरचे दौरे करावे. येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना बळ द्यावे व नागपुरात काँग्रेस मजबूत करण्यासाठी मदत करावी, अशी विनंतीही नेत्यांना करण्यात आली. चतुर्वेदी यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. यामुळे गटबाजी करणाऱ्यांना चाप बसला आहे, असे सांगत यानंतरही पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने केली. पक्षविरोधी काम करणाऱ्या कुठल्याही नेत्याला मदत केली जाणार नाही. भाजपाशी साटेलोटे असणाऱ्यांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे नेत्यांनी आश्वस्त केल्याचे विकास ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.