देवग्राम ग्रा.पं.मध्ये ग्राम
परिवर्तन पॅनेलचे पानिपत
लोहेंच्या पॅनलला मतदारांनी नाकारले : देवग्राम विकास आघाडीला बहुमत
नरखेड : नरखेड तालुक्यातील देवग्राम ग्रामपंचायत निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे व भाजपचे युवा नेते प्रवीण लोहे यांच्या ग्राम परिवर्तन पॅनलचा देवग्राम विकास आघाडीने ९ पैकी ८ जागा मिळवित पराभव केला. ग्राम विकासाचा संकल्प करणाऱ्या परिवर्तन पॅनलला देवग्रामच्या मतदारांनी नाकारले.
बबनराव लोहे यांची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटस्थ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे पुत्र प्रवीण लोहे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून लोहे हे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे चित्र आहे. प्रवीण यांनी काटोल मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ठाकूर यांच्यासारख्या वजनदार नेत्यापुढे ते तग धरू शकले नाही.
देवग्राम येथे गत २५ वर्षांपासून देशमुख यांच्या गटाच्या देवग्राम विकास आघाडीची सत्ता आहे. यावेळी प्रवीण लोहे यांनी बबनराव लोहे यांच्या मार्गदर्शनात ग्राम परिवर्तन पॅनल मैदानात उतरविले. निवडणूक पूर्व वातावरण तापल्यानंतर ग्राम परिवर्तन पॅनल यावेळी चमत्कार करेल असे गावात चित्र होते. दुसरीकडे देवग्राम विकास आघाडी महेंद्र वासाडे यांच्या नेतृत्वात राजू लोहे, अनिल वासाडे, नितीन वासाडे, पिंटू लोहे, मुरलीधर पांगुळ, मेघराज लोहे, रंगराव कनीरे, वासुदेव गिरडे, सुधाकर पांगुळ, ज्ञानेश्वर पांगुळ, अनिल वानखडे, कैलास दोडके, मृणाल वासाडे यांनी चाणक्य नीती वापरून निवडणुकीची व्यूहरचना केली. कोणताही गाजावाजा न करता लोहे यांच्या ग्राम परिवर्तन पॅनलचा ८-१ च्या फरकाने पानिपत केले. यात देवग्राम विकास आघाडीचे तेजेंद्र गिरडे, सारिका कांबळे ,पायल गेडेकर, देवेंद्र लोहे, लता वासाडे, योगिता लोहे, रवींद्र सोनोले, लता कनिरे हे विजयी झाले. ग्राम परिवर्तन पॅनलचे अतुल लोहे हे एकमेव सदस्य निवडून आले आहे.