निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुक्त आणि दिलखुलास! रंगरेखा, आकृतिबंध यांची चाकोरी नाही. मनास वाटतील तसे रंग चितारण्याची मुभा या बसोली नावाच्या शाळेत आहे. लहान मुलांना त्यांच्या भावविश्वनुरूप व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. असे रंगरेषांना बंधनमुक्त ठेवणारे जग चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी वसवले व साकारले. या चिकाटीने बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली. आज हे मुक्तविहारी कलाजग ४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या स्वतंत्र वृत्तीतून तीन पिढ्यांमध्ये कलेची आसक्ती फुलविण्याचे योगदान ‘बसोली’ने दिले आहे.चंद्रकांत चन्ने यांनी १५ मे १९७५ साली बसोलीची मुहूर्तमेढ रोवली. तशी ही काही कुठली संस्था किंवा ग्रुप नाही तर चिमुकल्यांच्या भावनेचे मुक्त गाव आहे. शांतिनिकेतन, बडोदा येथून स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर चन्ने यांना चित्रकलेत पीएचडी करायची होती. ‘मुलांची भाषा’ हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. त्यावेळी त्यांचे गुरू निहार रंजन रे यांनी मातृभाषेतच मुलांमध्ये काम कर अशी आज्ञाच दिली. त्यावेळी नागपूरला येऊन त्यांनी स्वत:च्या मनातील बसोलीला आकार दिला. हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेले व भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडविणारे गाव म्हणजे बसोली. याच गावावरून चन्ने सरांनी कलाजग निर्माण केले. पुढे तेव्हाचे नवयुग व आताचे पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत लहान मुलांमध्ये कलासक्ती रुजविण्याचा हा प्रवास सुरुच राहिला. मात्र निवृत्तीनंतरही या प्रवासात खंड पडला नाही.बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. आवड असल्यास सोयीचे. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ हे बसोलीचे ब्रीदवाक्य. १९९४ पासून बसोलीची मुक्तशिबिरे सुरू झाली. दरवर्षी दोन शिबिरे घ्यायचे. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनी व्यक्त होऊ द्यायचे. येथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र रेखाटण्याची मुभा. सरांचे केवळ मार्गदर्शन असते. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, ही शिबिरे घेण्याची चन्ने सरांची कळकळ.मुलांची अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालकही मनोमनी सुखावतो. त्यांनी बसोलीची सुरुवात केली तेव्हा ४३ विद्यार्थी होते. आज या कलाजगाची सदस्यसंख्या दीड लाखांच्याही वर गेल्याचे चन्ने यांनी सांगितले. गेली ४५ वर्षे बसोली नावाचे चन्ने यांनी उभारलेले, साकारलेले जग उत्तरोत्तर रंगत, विस्तारत गेले आहे.
अब्दुल कलामांकडून राष्ट्रपती भवनात सत्कारबसोलीच्या बालचित्रकारांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कवितांवर चित्र साकारले होते. डॉ. कलाम यांनी यातील ५० चित्रे विकत घेऊन राष्ट्रपती भवन येथे सजविली आणि या बालचित्रकारांना दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांचा सत्कार केला, त्यांच्यासोबत जेवण केले. बसोलीच्या चिमुकल्यांची सहा शिबिरे लंडन व सहा शिबिरे पॅरिसला आयोजित करण्यात आल्याची आठवण चंद्रकांत चन्ने यांनी सांगितली.