अमृता फडणवीस : दत्तकग्राम कवडसमध्ये शिधापत्रिकांचे वाटपहिंगणा : हाताला काम मिळणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असून, प्रत्येक व्यक्तीला काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामविकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी कवडस येथे शेतीसमवेत वस्त्रोद्योगासारख्या इतर जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यात येईल तसेच ग्रामवासीयांना गरजेनुसार पशुधनाचे वाटपही करण्यात येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या कवडस गावाला सोमवारी (दि.२४) त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जनसुविधेंतर्गत ग्रामपंचायत भवनाला भेट देत कवडस येथील ग्रामस्थांना शिधापत्रिका तसेच सातबाराचे वाटप केले. त्यानंतर अधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. ‘हॅबीटाट’ या स्वयंसेवी संस्थेच्या वंदना क्रिपलानी, स्मिता विल्सन, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, हिंगणा तहसीलदार प्रीती डुडुलकर, सरपंच मनीषा गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. गावातील लोकांना शुद्ध पाण्याचे पाणी मिळावे, यासाठी विहिरीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्यात येईल. यासाठी ‘आरओ वॉटर प्रोजेक्ट’ लवकरच सुरू करण्यात येईल. गावातील घरकूल बांधकामासाठी ‘हॅबीटाट’ स्वयंसेवी संस्था सहकार्य करणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर गावकऱ्यांना सर्व ऋतूंमध्ये पाणी उपलब्ध राहावे, यासाठी सिंचनाच्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतील. ग्रामपंचायत भवन येथे महसूल कॅम्पला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत ग्रामस्थांना अल्पावधीत मोफत सातबारा तसेच शिधापत्रिका मिळतील. ही एक नवीन पर्वाची नांदी असल्याचे मतही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात लंका गोंडगे, सिंधू मोजनकार, सुनीता मडावी यांना फडणवीस यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच सुरेश गोंडगे, गणेश गोंडगे, शेषराव मोजनकार, संदीप मोजनकार, श्यामराव बोळके, सचिन तोतडे, कृष्णाजी कांबळे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)१०० नागरिकांची दंत तपासणीनागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागातर्फे कवडस येथील ग्रामपंचायत कार्यालयात नि:शुल्क दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १०० रुग्णांची दंत तपासणी करण्यात आली. तसेच फिरत्या दंत चिकित्सालयाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दंत तपासणी शिबिर दर महिन्याला राबविण्यात येणार आहे. यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, विभागप्रमुख डॉ. मंजूषा वऱ्हाडपांडे, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. सचिन खत्री उपस्थित होते. फेटरीत अंगणवाडीचे लोकार्पणमुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांच्या दत्तकग्राम फेटरी येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक अनुदानातून बांधलेल्या अंगणवाडीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी किरण कोवे, सभापती नम्रता राऊत, पर्यवेक्षिका रजनी निखोटे व गावकरी उपस्थित होते.
ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण
By admin | Published: April 25, 2017 1:54 AM