बोंदरे अपक्ष म्हणून रिंगणात : कारेमोरे, झाडे, बिजेवार, कोंडे यांचीही तयारीनागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक दिवाळीनंतर होणार असली तरी आतापासूनच उमेदवारांना फटाके लावणे सुरू झाले आहे. भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे आहे. मात्र, आ. नागो गाणार यांच्या विरोधातील स्वकीयांमधील खदखद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मैदानातील इतर उमेदवारांना बळ मिळाले आहे. गाणार यांच्या विरोधातील बंड शांत करण्यात भाजपला यश येते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मोठ्या विरोधानंतरही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आ. नागो गाणार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, असे असले तरी अधिकृत उमेदवार नागो गाणार यांच्याविरोधात संघप्रणीत शिक्षक संघटना व भाजपचे पाठबळ असलेल्या संघटनांनी गाणारांविरोधात दंड थोपटले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यकर्ते असलेले संजय बोंदरे यांनी गाणार यांना उघड आव्हान दिले. बोंदरे हे जयविजय उच्च प्राथमिक शाळा,भांडेवाडी येथे मुख्याध्यापक आहेत. संघपरिवार व भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे. एकीकडे बोंदरे यांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न झाले तर दुसरीकडे बोंदरे यांना संघ परिवारातून तेवढेच भक्कम पाठबळ देण्यात आले. त्यामुळे बोंदरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. बोंदरे हे आक्रमकपणे प्रचाराला लागले आहेत. शिक्षक परिषदेच्या नागपूर विभागाचे कार्याध्यक्ष शेषराव बिजेवार यांनीही दंड थोपटले आहेत. परिषदेचा एक गट त्यांच्यासाठी कामाला लागला आहे. त्यामुळे गाणार यांच्यासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या पक्षसंघटनेत सक्रिय असलेले पण शिक्षक संघटनांशी फारसा संबंध नसलेले काही नेतेही उमेदवारीसाठी इच्छुक आहे. या नेत्यांनी दबाव निर्माण केल्यास गाणार यांच्यापुढील संकट वाढण्याची शक्यता आहे.गेल्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांचा गाणार यांनी पराभव केला होता. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आनंदराव कारेमोरे यांना मैदानात उतरविले आहे. शिक्षक भारतीतर्फे राजेंद्र झाडे टक्कर देत आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे यांनीही आपली दावेदारी सादर केली आहे. सर्वच उमेदवार पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. शिक्षक मतदारांपर्यंत पोहचून गाणार हे कुठे अपयशी ठरले व आपल्याला संधी मिळाली तर काय करणार हे पटवून देत आहेत. विशेष म्हणजे गाणार यांच्या विरोधातील असंतोषाचा आपल्यालाच फायदा मिळेल, असा प्रत्येकाचा दावा आहे. सर्वच उमेदवारांची प्रसिद्धीपत्रके शाळांमध्ये पोहचली असून शिक्षकांमध्ये निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शेवटी ‘गुरुजी’ विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यामुळे या लढतीत ते कुणाला पहिल्या नंबरने पास करतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
गाणार यांना स्वकीयांकडूनच फटाके
By admin | Published: October 22, 2016 2:45 AM