लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : नवीन भूसंपादन कायदा सन २०१४ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केल्यानंतरसुद्धा केराची टोपली दाखविणाऱ्या वेकोलिच्या थातूरमातूर कार्यप्रणालीवर हेवती गावकरी चांगलेच संतापले आहेत. दोन दिवसापासून पुनर्वसन आणि समस्या या मुद्यावरून गावकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे मकरधोकडा क्रमांक ३ (दिनेश खदान) कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ठप्प पडले आहे.
उमरेड तालुक्यातील हेवतीनजीक सन २०१५ पासून मकरधोकडा खाण क्रमांक ३ चे उत्पादन कार्य सुरू झाले. कोळसा खाण ते हेवती या गावाचे अंतर केवळ ४०० मीटर आहे. अंतर फारच कमी असल्याने वेकोलि प्रशासनाने आधी हेवती गावाच्या पुनर्वसनाचा गुंता सोडवावयास हवा होता. आधी खाण सुरू होऊ द्या, पुनर्वसन आणि समस्या सोडवू, अशी गोडीगुलाबीची भाषा वेकोलिने वापरली. उत्पादन सुरू केले. पाच वर्षानंतरही गुंता सोडविण्यात आला नाही. वारंवार निवेदने, चर्चा आणि आंदोलनानंतरही वेकोलि प्रशासन केवळ पोकळ बाता करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे.
उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वेकोलि प्रशासनावर सडकून टीका करीत हेवती गावकऱ्यांनी शनिवारपासून (दि. १२) बेमुदत आंदोलन सुरू करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. जोपर्यंत नवीन नियमावली आणि कायद्यान्वये मोबदला व पुनर्वसन केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुरेखा वाघ, भिका भोयर, राजू येतारी, राहुल हुलके, संजय डांगाले, शिशुपाल शंभरकर, विठ्ठल हुलके, शेषराव हुलके, रवी चिचुलकर, मारोती पिल्लेवान, अर्चना चिचुलकर, भारती पिल्लेवान, सुरेखा पोटे, संध्या पिल्लेवान, अनिल लोखंडे, देवा डांगाले, कैलास हुलके, सुभाष चाफले, किसना राऊत, पुनाराम आदोळे, मनोहर ठाकरे, राकेश ठाकरे, अशोक गुप्ता, प्रकाश गुप्ता, अरुण गुप्ता, गौरव हुलके, गजानन मूल, उपास पाल आदींनी दिला आहे.
....
ब्लास्टिंगचे हादरे
केवळ ४०० मीटर अंतरावर १,२०० लोकवस्तीचे वसलेल्या हेवती गावकऱ्यांना दररोज ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा सामना करावा लागत आहे. ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा, घरांची पडझड सुरू असल्याने अनेक जण जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आणि धुळीमुळे आरोग्यविषयक समस्यांचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे.