उमरेड : विद्युत कंपनीने उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी आणि सुकळी या गावांमधील पाणीपुरवठ्याची वीज कापली. या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हिवरा-हिवरी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
उमरेड येथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरा येथे १२ ऑगस्टला पाणीपुरवठ्यावी वीज कापल्या गेली. त्यानंतर थकबाकीच्या काही रकमेचा भरणा केल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात आली. दुसरीकडे १६ ऑगस्टला हिवरी आणि सुकळी येथील गावाच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुकळी, हिवरा आणि हिवरी या तीनही गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाची सुमारे २ लाख ५० हजार रुपयाची थकबाकी आहे. या तिन्ही गावातील पथदिव्यांच्या थकबाकीची रक्कम एक लाख रुपयाच्या आसपास आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुकळी आणि हिवरी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. यावेळी सरपंच किसन गिरसावळे, उपसरपंच राजविलास डोये, ग्रामसेवक क्षितिज निकोसे हजर होते. त्यांच्यासमोरच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. चार दिवसापासून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. पथदिव्यांअभावी रस्त्यावर काळोख पसरल्याने मुले, तरुणी आणि महिलांना त्रास सोसावा लागत आहे.
थकबाकीची रक्कम तातडीने भरा, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. दीड तास झालेल्या चर्चेतून त्यांचे समाधान झाले नाही. अशातच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे आपली व्यथासुद्धा ग्रामस्थांनी मांडली. गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामसेवक क्षितिज निकोसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सुकळीची पाणी समस्या गंभीर
सुकळी येथील ग्रामस्थांना नाला पार केल्यानंतर अंदाजे एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. नाल्याला पूर असला की पाण्याची गंभीर समस्या उद्भवते. शिवाय गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याची समस्या भेडसावत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामसेवक कार्यालयात हजर राहत नाही. गावाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.