पाहमी येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
चिचाळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-ई चे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र या महामार्गावरील गावांना नाल्या, प्रवासी निवारे, गाव फलक, ब्रिक्स आदी सुविधा अजूनही उपलब्ध झालेल्या नाही. गावांना या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी कंत्राटदार कंपनीला तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दहा दिवसाच्या आत सदर समस्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाहमी येथील ग्रामस्थांनी उमरेड येथील उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
सदर उमरेड-वरोरा महामार्गावरील १६ किमी कामाचे कंत्राट एस.ए. सावंत कंपनीला मिळाले होते. या कंपनीचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र महामार्गालगतच्या पाहमी, चिचाळा, गरडापार, गोटाळी (मालेवाडा) या चार गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाहमी येथील पंकज राऊत, निकेश भोयर, सूरज मोहोड, बालाजी चौधरी यांनी केला आहे. पाहमी येथे महामार्गालगत नाल्या उपलब्ध करून न दिल्याने पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याचे सरपंच विजय कारमोरे यांनी सांगितले.