लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी म्हणून म्हणून आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवून आयुष्य पणास लावणारे, थोर अभ्यासक आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित समता सैनिक दलाचे वरिष्ठ मार्गदर्शक मार्शल अॅड. विमलसूर्य चिमणकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मायाताई आणि दोन मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अॅड. विमलसूर्य चिमणकर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९५५ ला झाला असून विद्यार्थी जीवनापासूनच ते आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. रिपब्लिकन पार्टीच्या एकत्रीकरणाकरिता त्यांनी सतत प्रयत्न केलेत. एकंदरच आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या विचारांवर अधिष्ठित व शिस्तप्रिय व्हावी म्हणून ते अखेरपर्यंत धडपडत राहिले. द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर, रिडल्स नंतरचा जातीय वणवा, दोन सूर्य दोन घुबडे, सूर्यांकुर, मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद्व या महत्त्वांच्या पुस्तकांबरोबर नामांतर वा सत्तांतर, खैरलांजी एक सवाल, वेटिंग फॉर व्हिसा, साकेत की अयोध्या? आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.गेल्या ४५ वर्षांपासून समता सैनिक दलाची एक शिस्तबद्ध ओळख त्यांनी निर्माण केली. समता सैनिक दलाच्यावतीने अंबाझरी घाट येथे त्यांना मानवंदना अर्पण केली. यावेळीे त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा झंझावात हरपल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:28 AM