चव्हाण, राणे, विखे-पाटील यांच्यावर टीका : ‘हायकमांड’कडे तक्रार करणार नागपूर : स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना कॉंग्रेस पक्षातदेखील मतभेद दिसून येत आहेत. विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची भूमिका घेणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर नेत्यांवर तोफ डागली आहे. हे आपले नेते नसून ते ज्युनिअर आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी हे नेते अखंड महाराष्ट्राची भूमिका घेत आहेत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, डॉ.सतीश चतुर्वेदी व डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भाजपाविरोधात विधिमंडळात सर्वपक्षीय एकजूट झाली आहे. अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्याच्या मुद्यावरून शिवसेना व कॉंग्रेसदेखील एकत्र आल्याची चर्चा होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला जोरदार विरोध केला. दुसरीकडे विदर्भातील कॉंग्रेसचे नेते मुत्तेमवार, राऊत व चतुर्वेदी यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे व याअगोदरदेखील त्यांनी जाहीरपणे मांडली आहे. मंगळवारी या तिन्ही नेत्यांची नागपुरात बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी स्वपक्षीय कॉंग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. विदर्भातील काँग्रेसजनांचे मत जाणून न घेता चव्हाण, राणे व विखे पाटील यांनी विदर्भाला विरोध केला आहे. शिवसेनेसोबत अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्याचीदेखील तयारी केली होती. परंतु यासाठी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेतलेली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असे मत मुत्तेमवार, चतुर्वेदी व राऊत यांनी व्यक्त केले. अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव आणण्यासंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी ‘हायकमांड’ची परवानगी घेतली नव्हती. शिवाय कॉंग्रेसने अद्याप वेगळ्या विदर्भाची मागणी सोडलेली नाही. परंतु सध्या आमचे लक्ष्य भाजपा सरकारविरोधात लढा हेच आहे. चव्हाण, राणे, विखे-पाटील यांची ‘हायकमांड’कडे तक्रार करणार असल्याचे विदर्भातील या तिघा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) चव्हाण, राणे, विखेंमुळे काँग्रेस रसातळाला चव्हाण, राणे, विखे-पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नेहमीच विदर्भाच्या विरोधात राहिले आहेत. त्यांनी विदर्भाला अक्षरश: लुटले. आता काय १२०० लोक मेल्यानंतर वेगळा विदर्भ देणार का, असा सवाल विलास मुत्तेमवार यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे यांनी काँग्रेस संपविली. विखे-पाटलांना आहे ती जबाबदारी पेलणे जमत नाही. या नेत्यांमुळे काँग्रेस रसातळाला गेली आहे, असा आरोप विदर्भवादी कॉंग्रेस नेत्यांनी केला. मुख्यमंत्रीदेखील विदर्भाला विसरले निवडणुकांच्या वेळी विदर्भातील जनतेला देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईतील मलबार हिल येथे रहायला गेले व ते विदर्भाच्या मुद्याला विसरले. विदर्भाच्या मुद्यावर नागरिकांना आश्वासन देऊन आता मौन पाळत आहेत, अशी टीका नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांनी केली.
विदर्भवादी काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल
By admin | Published: August 03, 2016 2:39 AM