नागपूर : महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी संदिपान भुमरे यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे विनोद पाटील यांनी या जागेचा आग्रह सोडलेला नाही. सोमवारी विनोद पाटील यांनी नागपुरात दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्याला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही ताकतीने ही निवडणूक लढविणार, असे पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले.पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, या जागेवर लढण्यासाठी मी इच्छुक आहे. त्यामुळे आता महायुतीने काय ते ठरवायचे आहे. येथील उमेदवारी मला मिळाली यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती.
महायुती मधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. आता उमेदवारी जाहीर झाली असली तरी या निर्णयावर पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे. मतदार संघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचे गणित आहे. ती चर्चा करण्यासाठी मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या मतदार संघाची काय स्थिती आहे हे पुन्हा एकदा तपासले पाहिजे यासाठी ही भेट होती, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.