संसर्ग टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई : १११ मंगल कार्यालयाची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता मंगल कार्यालय, लॉन तसेच गर्दीचे ठिकाण हे हॉट स्पॉट ठरत आहेत. याचा विचार करता प्रशासनातर्फे दडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणावर नजर ठेवली जाणार आहे. परंतु सभा, बैठकांचे आयोजन सुरू असल्याने प्रशासन मंगल कार्यालये व लॉन यांनाच वेठीस का धरत आहेत, असा प्रश्न उपस्थित करून नियमाचे उल्लंघन सुरू आहे. विवाह समारंभ व बाजारातील गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा कोविड संसर्ग होण्याचा धोका विचारात घेता, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. रविवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी १० झोनमधील १११ मंगल कार्यालय, लॉन यांची तपासणी केली. नियमाचे उल्लंघन केल्याने नऊ ठिकाणी कारवाई करून १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला. यात लॉन, मंगल कार्यालयासोबतच शिकवणी वर्गाचा समावेश आहे.
आयुक्तांनी आता साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चा वापर करून आदेश निर्गमित केले आहेत. याअंतर्गत गर्दी जमवून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी आकारण्यात येणारा दंड वाढविला आहे. सभागृह, मंगल कार्यालय, लॉन आदी कार्यक्रमस्थळी व्यवस्थापकाने कोविड नियमाचे उल्लंघन केले, मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नाही, गर्दी जमविल्यास पहिल्या वेळी १५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास २५ हजार तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास ५० हजार रुपये दंड आकारला जात आहे. आयोजकांवर १० हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. तसेच नियमांतर्गत २०० ऐवजी ५० लोकांना विवाह समारंभाला उपस्थित राहणयाची परवानगी आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे. त्यानुसार कारवाई होत असूनही अनेक जण नियम पाळत नसल्याचे दिसत आहे.
....
झोननिहाय मंगल कार्यालय व लॉनची तपासणी
झोन मंगल कार्यालय
लक्ष्मीनगर ७
धरमपेठ १२
हनुमाननगर ०५
धंतोली १२
नेहरूनगर २१
गांधीबाग ०७
सतरंजीपुरा ०९
लकडगंज ११
आसीनगर ११
मंगळवारी १६
............