लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने शनिवार-रविवार या दोन दिवशी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी सर्वत्र सामसूम होती. दुकाने बंद होती, परंतु दुसरीकडे एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. यावेळी बहुतांश प्रवाशांनी मास्क लावलेला होता, परंतु सुरिक्षत अंतराच्या नियमांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.
लॉकडाऊन असल्याने कमीतकमी बसच्या फेऱ्या सुरू असल्याने गणेशपेठ बस स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. यात बहुतांश लोक ग्रामीण भागातील होते. बंदमुळे त्यांची कामे न झाल्याने ते परत जात होते, परंतु बस स्थानकावर येताच, ते सुरक्षित अंतराचे नियमच विसरून गेले. मास्क घालून असलेल्या लोक गर्दी करून होते. बस स्थानकातील उपहारगृहातही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. येथे काउंटरवर लोक मास्क उतरवून बोलत होते. पॅकबंद नाश्ता खरेदी करीत होते. दुसरीकडे बस स्थानकातील प्लॅटफार्मवरही लोक गर्दीनेच उभे होते. बसमध्ये बसण्याची प्रवाशांची चढाओढ सुरू होती. लोक बसच्या खिडकीतूनही आत जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु महामंडळातील कुणीही कर्मचारी त्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगत नव्हता. अशा परिस्थितीत मध्यवर्ती बस स्थानक हे कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.