मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर, : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, याबाबत सोमवारी मनपाद्वारे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज बुधवारपासून याची अंमलबजावणी होत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना पाच हजार दंड तसेच पोलीस कारवाई केली जाणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.
कोविडसंदर्भात मनपाद्वारे सुरू असलेल्या उपाययोजनांचा मंगळवारी राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील कोरोना वाॅररूममध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, राजेश भगत, सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राऊत, अशोक पाटील, विजय हुमणे, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील यांच्यासह सर्व झोनचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची मनपाच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे. मात्र यासाठी नियम निर्धारित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधितांकडून गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे गृह विलगीकरण नियमांचे पालन व्हावे याबाबत मनपा झोनस्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्क्वाॅड) गठित करण्यात आले असून, वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
....
एसएमएस मिळणार नियमांची माहिती
गृह विलगीकरणातील बाधितांच्या सोयीसाठी त्यांच्या मोबाईलवर मनपाद्वारे एसएमएस पाठविले जाणार आहे. त्यामध्ये त्यांना पाळावयाचे नियम, घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच निकषाचे पालन न करणाऱ्यावर कारवाईबद्दल सूचनाही दिली जाईल.