जातीय,धार्मिक हिंसाचाराचा शेकडोंनी केला निषेध : संविधान चौकात विविध संघटना सहभागी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरक्षणाच्या नावावर हिंसक झालेल्या जमावाद्वारे हिंसाचार वाढला आहे. अखलाखपासून नुकत्याच झालेल्या जुनैदच्या हत्येपर्यंत घडलेल्या हिंसाचारामुळे विशिष्ट समुदायांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंदिर-मशीदच्या नावावर, कधी जाती-धर्माच्या आणि गोरक्षणाच्या नावावर होणारा हिंसाचार देशातील शांतता नष्ट करीत आहे. हा हिंसाचार ‘आमच्या नावावर करू नका’ असे संदेश देत विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संविधान चौकात निषेध नोंदविला. ‘नॉट इन माय नेम’ ही मोहीम सध्या देशभरात जोर धरत आहे. गोरक्षणाच्या नावावर अचानक कुठेतरी आग भडकते आणि शेकडो, हजारोंच्या संख्येने असलेल्या जमावाद्वारे विशिष्ट समुदायाच्या लोकांना लक्ष्य केले जाते. अखलाखपासून जुनैदपर्यंत अनेकजण या हिंसाचाराचे बळी ठरले असून हा भीतीदायक प्रकार लोकतांत्रिक देशात अशांतता पसरवित आहे. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांकडून असे भडकविण्याचे काम केले जात असून या हिंसाचाराविरोधात राष्ट्रव्यापी आवाज उठत आहेत. याच मोहिमेंतर्गत संविधान चौकात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी या हिंसाचाराविरोधात निषेध नोंदविला. या निषेध आंदोलनात जमाअत-ए- इस्लामी हिंद, वेलफेअर पार्टी आॅफ इंडिया, भारत मुक्ती मोर्चा, मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीस, इंडिया पीस सेंटर, मराठा सेवा संघ, जमियत-उलेमा-ए-हिंद, एमपीजे, बामसेफ, स्टुडंट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया, सेंटर फॉर सोशल रिसर्च अॅन्ड एम्पॉवरमेंट, संविधान फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, निळाई, लोकशाही संरक्षण समिती, भारिप बहुजन महासंघ, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आॅफ सिव्हील राईट्स आदी संघटनांचा समावेश होता. गोरक्षणाच्या नावावर धार्मिक हिंसाचार भडकविणाऱ्या तत्त्वांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. जगभरात असा हिंसाचार असा हिंसाचार केवळ भारतात वाढत आहे, असे नाही तर जगभरात असे प्रकार होत आहेत. आर्थिक आणि राजकीय सत्तेसाठी योजनाबद्ध पद्धतीने सिव्हील आणि प्रॉक्सी युद्धाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. आपला धर्म इमाने इतबारे मानणाऱ्याला कट्टरपंथी म्हटल्या जाते. मात्र सध्याच्या काळात या शब्दाला हिंसक रुप दिले जात आहे. भारतातही अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, आर्थिक सुधार या मुद्यांपासून लोकांना भटकवण्यासाठी अशी द्वेषपूर्ण परिस्थिती निर्माण केली जात आहे. देशाचे तुकडे पाडण्याचा हा प्रकार आहे. - सलमान अहमद ही तर गृहयुद्धाकडे वाटचाल विशिष्ट समुदायांमध्ये भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने धार्मिक द्वेष निर्माण करून हिंसाचार भडकविल्या जात आहे. विविध संस्कृ तीने नटलेला हा देश अशा हिंसाचाराने वाटला जात आहे. अशा सांस्कृतिक दहशतवादामुळे देशाची एकता व अखंडता धोक्यात येत आहे. हा देशात गृहयुद्ध माजविण्याचा प्रकार असून याला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. - कबीर खान, वेलफेअर पार्टी आॅफ इंडिया योजनाबद्ध ‘मॉब लिंचिंग’ जमावाद्वारे होणारा हिंसाचार (मॉब लिंचिंग) हा काही अचानक घडणारा प्रकार नाही. योजना आखून हा प्रकार केला जात आहे. यासाठी द्वेषाची भाषा कारणीभूत आहे. आज देशासमोर आर्थिक, सामाजिक अनेक प्रश्न आहेत व युवकांना या प्रश्नांचे उत्तर हवे आहे. मात्र तरुण वर्गाला या प्रश्नांपासून भटकविण्यासाठी अशी द्वेषभावना पसरविली जात आहे. मुस्लिमांनी इस्लामच्या नावावर आणि हिंदू तरुणांनी धर्म व गोरक्षणाच्या नावावर होणाऱ्या अशा हिंसाचाराला बळी पडू नये. - शुजाउद्दीन फहाद, स्टुडंट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन
ही हिंसा ‘आमच्या नावाने नको’
By admin | Published: July 08, 2017 2:19 AM