लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तरुणाच्या दोन गटातील वादाचा आज भडका उडाला. मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि त्याच्या साथीदारांनी प्रतीक देसाई तसेच त्याच्या साथीदारांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघे जबर जखमी झाले. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
बजाजनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अर्जुनच्या गटातील सुबह तसेच प्रतीक देसाई या दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्यांच्यात अनेकदा बाचाबाचीही झाली आहे. हा वाद मिटवण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, सोमवारी सकाळी ११ वाजता सुबह आणि प्रतीक त्यांच्या मित्रांसह बजाजनगर चाैक मार्गावरच्या एका टपरीजवळ पोहचले. येथे वाद मिटवण्याऐवजी वाढला. त्यामुळे सुबहने अर्जुनला फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. अर्जुन त्याच्या साथीदारासह तेथे पोहचला. तोपर्यंत सुबह आणि प्रतीक तसेच त्यांच्या साथीदारांनी एकमेकांना मारहाण सुरू केली होती. अर्जुन आणि साथीदारांनीही प्रतीक तसेच मित्रांना बेदम मारहाण केली. प्रतीकने अर्जुनच्या हाताला चावा घेतला. या हाणामारीत तिघे जबर जखमी झाले. माहिती कळताच बजाजनगरच्या ठाणेदार शुभांगी देशमुख आपल्या साथीदारांसह तेथे पोहचल्या. त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले. प्रतीक, अर्जुन आणि अन्य एक अशा तिघांचे मेडिकल करण्यात आले. त्यानंतर दोन्हीकडून परस्पराविरुद्ध मिळालेल्या तक्रारीवरून या प्रकरणात रात्री पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
---
पोलिसांवर दडपणाचा प्रयत्न
या प्रकरणात दोन्हीकडून पोलिसांवर वेगवेगळे दडपण आणण्याचे दिवसभर प्रयत्न झाले. त्याचमुळे गुन्हे दाखल व्हायला उशीर झाला. या प्रकरणात आरोपींची नावे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकली नाही.
--