नागपूर : पावसाळी वातावरणामुळे ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. व्हायरलसोबतच डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बदलत्या वातावरणाचा प्रभाव शरीरावर पडत आहे. दिवसा उन्ह-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. सोबतच सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी अशा विविध कारणांनी लोक आजारी पडत आहेत. औषधोपचारासाठी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. यातच डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. मेडिकल आणि मेयो रुग्णालयात या आजाराचे दिवसाकाठी १५-२० रुग्ण येत आहेत. पाऊस वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्हायरलसोबतच मलेरिया, कावीळ, अतिसार व विषमज्वराचे रुग्णही दिसून येत आहेत.
- एकाकडून दुसर्याकडे विषाणू संक्रमित
तज्ज्ञाच्या मते, ‘व्हायरल फिव्हर’ म्हणजे संक्रमित ताप. या तापाचे विषाणू घशात सुप्तावस्थेत निष्क्रिय राहतात. थंड वातावरणाशी संपर्क आल्यास किंवा थंड पाणी, आईसक्रिम, कोल्ड्रीक्स प्यायल्यास विषाणू सक्रिय होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीवरच हल्ला चढवितात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फैलावतो. यामुळे एकाच घरात व्हायरल फिव्हरचे एकापेक्षा जास्त रुग्ण दिसून येतात.
-वातावरण विषाणूंसाठी पोषक
सध्या शहरातील वातावरण विषाणूंसाठी पोषक ठरते. विशेषत: पावसाळी वातावरणामुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याशिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने डेंग्यूचा आजारही वाढत आहे.
-लक्षणे अंगावर काढू नका
वातावरणातील बदलाचा परिणाम विशेषत: लहान मुलांवर अधिक दिसतो. प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लवकर विषाणूजन्य आजार होतात. वृद्धांनाही ताप, खोकला, अंगदुखी आदी व्याधी जाणवू लागल्या आहेत. यामुळे सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय, गर्दीचे ठिकाण टाळा. पुरेशी झोप घ्या. बाहेरील खाद्य पदार्थ टाळा.
-डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.