सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या डेल्टा विषाणूमुळे १०० दिवसात जी रुग्णसंख्या वाढत होती, ती या नव्या विषाणूने केवळ १५ दिवसात गाठली आहे. यावरून नव्या विषाणूचा धोका समजून येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील १०४ गावे १०० टक्के लसवंत झाली आहेत.
कोरोनाची लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. राज्य शासनाच्या मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशा विविध अभियानामुळे जिल्ह्यातील वयोगट १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिला डोस प्राधान्याने देण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ७०० गावांपैकी १०४ गावाने लसीचा पहिला डोस घेऊन शतप्रतिशत लसीकरण पूर्ण केले आहे. तसेच १५९ गावांचे लसीकरण ९५ टक्क्यांवर पोहचले आहे.
- ८८.३४ टक्के लोकांनी घेतला पहिला डोस
नागपूर जिल्ह्यात ८८.३४ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. परंतु त्यातुलनेत दुसऱ्या डोसची संख्या ४८.८८ टक्केच आहे. शहराचा विचार केल्यास १८ लाख ३७ हजार ९८० लोकांनी पहिला तर, ११ लाख ६ हजार २५८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीणमध्ये १४ लाख ४१ हजार ५०२ लोकांनी पहिला तर, ६ लाख ८९ हजार २५७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाला १० महिन्याचा कालावधी होत असताना पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी असल्याचे चित्र आहे.
विदेशातून कुणी आला तर क्वारंटाईन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले, नव्या व्हेरिएंटला घेऊन खबरदारीच्या सूचना विमानतळ प्राधिकरणला देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास आमदार निवासातील क्वारंटाईन सेंटर उघडले जाईल. मेयो व मेडिकलमधील विशेष वॉर्डात त्यांना वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील.
- दुसऱ्या डोसची गती वाढविण्यासाठी प्रयत्न
हर घर दस्तक मोहिमेंतर्गत व रात्रीच्या वेळीही लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून दुसऱ्या डोसची गती वाढविण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. १०४ गावात झालेल्या १०० टक्के लसीकरणामुळे नागरिकांच्या मनातील लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज व भीती दूर झाल्याचे दिसून येते.
-डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर
- तालुकानिहाय १०० टक्के लसीकरण गावांची संख्या
भिवापूर : ३ गावे
कामठी : १४ गावे
काटोल : ६ गावे
कुही : १ गाव
मौदा : १४ गावे
नागपूर : २४ गावे
नरखेड : ६ गावे
पारशिवनी : १ गाव
रामटेक : ६ गावे
सावनेर : ८ गावे
उमरेड : २१ गावे