सलग ५३ तास कुकिंग गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंदनागपूरची जगात वेगळी ओळख विक्रम शेतकऱ्यांना समर्पित नागपूर : घड्याळीचा काटा ४.३० च्या दिशेने सरकायला लागला... दुपारपासून वाजणाऱ्या ढोल-ताशांचा आवाज आणखी तीव्र झाला...चाहत्यांच्या घोषणांचा जोरही वाढायला लागला...मीडियाचे कॅमेरे पुढे सरसावले...घड्याळीच्या काट्यांनी ४.३०च्या आकड्यांना स्पर्श करताच इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्सचे सभागृह टाळयांच्या गडगडाटाने दणाणून गेले. पण, पुढच्याचक्षणी एक नीरव शांतता पसरली...विष्णू मनोहर यांनी ५२ तास कुकिंगचा प्रस्तावित संकल्प आणखी एक तासाने पुढे वाढवला...चाहत्यांनी तितक्याच जोषात त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले...अन् अखेर रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग ५३ तास कुकिंगच्या नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालत नागपूर शहराला जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली. मैत्री परिवाराच्या पुढाकाराने २१ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअर्स सभागृहात या कुकिंग मॅरेथॉनला सुरुवात झाली होती. ५३ तासांच्या अविरत प्रवासानंतर रविवारी २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ती थांबली. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणारा हा विश्वविक्रम विष्णू मनोहर यांनी शेतकऱ्यांना समर्पित केला. याआधी असा विक्रम अमेरिकेच्या बेंझामिन पेरींच्या नावावर होता. त्यांनी २०१४ साली सलग ४० तास कुकिंग करून हा विक्रम नोंदविला होता. पेरी यांनी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे व्यंजन तयार केले होते. विष्णू मनोहर यांनी मात्र केवळ शाकाहारी आणि १०००१ च्यावर व्यंजन तयार करून हे दोन वेगळे विक्रमही प्रस्थापित केले. आठ चुलींवर ही कुकिंग मॅरेथॉन चालली. ३७५ प्रकारच्या भाज्या, ग्रोसरी, मसाले यात उपयोगात आणले गेले. यातून ३०० ते ४०० किलो जेवण तयार झाले. यात ९० टक्के भारतीय तर १० टक्के विदेशी व्यंजन होते. ५३ तासांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी सर्वात आधी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. या विश्वविक्रमी प्रवासात त्यांना अविरत सोबत करणारे त्यांचे कुटुंबीय, मैत्री परिवार संस्था, चाहते आणि मीडियाचे त्यांनी आभार मानले. विष्णू मनोहर यांचा हा विश्वविक्रम प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांचे गुरू कामत ग्रुप्स आॅफ हॉटेल्सचे मालक विठ्ठल कामत विशेष करून नागपूरला आले होते. विश्वविक्रमात डॉक्टर्सचा वाटा मोठासलग ५३ तास जागून पाककृती तयार करणे, हे सोपे काम नव्हते. यासाठी विष्णू मनोहर यांचे आरोग्य सांभाळण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार होते. शहरातील प्रसिद्ध डॉ. पिनाक दंदे व डॉ. नीतेश खोंडे यांनी हे आव्हान स्वीकारले व विष्णू मनोहरांसोबत तीन दिवस सलग जागून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. या कुकिंग मॅरेथॉनमध्ये थकवा वा ग्लानीचा अडसर ठरू नये म्हणून दोन्ही डॉक्टरांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. विष्णू मनोहरांच्या या विश्वविक्रमात डॉ. पिनाक दंदे व डॉ. नीतेश खोंडे यांचा मोठा वाटा आहे.(प्रतिनिधी)अमृता फडणवीस यांनी केले अभिनंदनविष्णू मनोहर यांनी ५३ तास कुकिंगचा विश्वविक्रम प्रस्थापित करताच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सभागृहात पोहोचल्या व त्यांनी विष्णू मनोहर यांना प्रत्यक्ष भेटून देशाची मान जगात उंचावल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.शेवटच्या तीन व्यंजनांचे विशेष ‘समर्पण’कुकिंग मॅरेथॉनच्या शेवटच्या ५३ व्या तासात विष्णू मनोहर यांनी तीन विशेष व्यंजन बनविले. यातले पहिले व्यंजन चण्याच्या पिठाचा हलवा त्यांनी देवी अन्नपूर्णा, झुणका-भाकर शेगावचे संत गजानन महाराज तर खोबरे-रव्याचे लाडू हे तिसरे व्यंजन त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना समर्पित केले. हे खरंच फार आव्हानात्मक काम होतं. परंतु विष्णूच्या क्षमतेवर आणि स्वत:च्या अनुभावावर पूर्ण विश्वास होता. या तीन दिवसांत विष्णू मनोहर यांचा डायट कसा असेल, रक्तदाब कसा नियंत्रणात ठेवता येईल, याचे सर्व योग्य नियोजन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम या विश्वविक्रमाच्या रूपाने तुमच्या समोर आहे.डॉ. पिनाक दंदेकुठल्याही परिस्थितीत थकवा येऊ द्यायचा नाही, यावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. त्यासाठी विशेष प्रकारचे तेल खास केरळातून मागविण्यात आले होते. या तेलाच्या उपयोगाने हेड, शोल्डर, लेग मसाज केली. कमी वेळात जास्त झोप घेण्यासाठीही या तेलाचा उपयोग झाला. या विश्वविक्रमाचा आपणही एक भाग होऊ शकलो, याचा मनस्वी आनंद आहे.डॉ. नीतेश खोंडे एका भारतीयाने हा विश्वविक्रम करावा, यासाठी ज्यांनी ज्यांनी मला बळ दिले, चेतना दिली त्या सर्वांचा हा विक्रम आहे. माझ्या कलेत अन्न हेच पूर्ण ब्रह्म असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जगातील कुणीही अन्नापासून वंचित राहू नये ही कामना मी याप्रसंगी करतो आणि लोकांना पोटभर जेवता यावे, यासाठी शेतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांना मी हा विक्रम समर्पित करतो- विष्णू मनोहर
विष्णूंचा विश्वविक्रम
By admin | Published: April 24, 2017 1:33 AM