लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही शहराच्या विकासात तेथील सर्व पातळीवरील नागरिकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. जनतेच्या सूचनांचा अंगिकार केला तर त्यातून अनेक समस्या निश्चितच दूर होऊ शकतात. ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ व्हावे यासाठी लोकांच्या अपेक्षा व त्यांची शहराबाबतची मते जाणून घेत आहे. कारण तयार होणारे ‘व्हिजन’ हे माझे नसेल तर ते जनतेचे असेल, असे प्रतिपादन नागपूरचे महापौरसंदीप जोशी यांनी केले. मंगळवारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.मी महापौर म्हणून पदग्रहण केले तेव्हाच ठरविले होते की अगोदर जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या, मते, अपेक्षा या सर्व गोष्टी ऐकून घेईन. त्यादृष्टीने दररोज सकाळी शहरातील विविध बगिच्यांमध्ये जाऊन ‘वॉक अॅन्ड टॉक’ हा प्रयोग राबवत आहे. नागरिकांकडून विविध समस्या कळत आहेत. अनेक समस्या या मूलभूत बाबींसंदर्भातील असून एकत्रित प्रयत्नांतून त्या सहज सोडविल्या जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे शहर काही माझे किंवा माझ्या पक्षाचे नाही. येथे सर्वपक्षीय विचारधारा असलेले लोक राहतात. शहरातील समस्या पाहून माझ्याप्रमाणे आ. नितीन राऊत किंवा आ. विकास ठाकरे यांनादेखील वेदना होतातच. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपा या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचेदेखील म्हणणे मी ५, ६ व ७ डिसेंबर रोजी ऐकून घेणार आहे. सोबतच शहरात विविध क्षेत्रात कार्य करणाºया स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशीदेखील भेट घेणार आहे. यासाठी ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून लिखित स्वरुपातदेखील सूचना बोलावू, असे संदीप जोशी यांनी सांगितले.अतिक्रमणाबाबत कठोर धोरण राबविणारनागपूर शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणाची समस्या ही प्रचंड वाढली आहे. लोकांना चालायला फूटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे यासंदर्भात कठोर भूमिका घेणे आवश्यक झाले आहे. ७ डिसेंबर रोजी नागपूर मनपाची केवळ अतिक्रमणासंदर्भात मंथनासाठी विशेष सभा बोलविण्यात आली आहे. अनेकदा जवळच्या लोकांचा ‘इगो’ सांभाळताना शहराचे नुकसान होते. मात्र अतिक्रमणासंदर्भात कुणाचीही गय करणार नाही. अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाईसाठी दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीदेखील तयार करण्यात आली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.
कचरा समस्या दूर होणारशहरातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग लागले होते. मात्र आता नवीन दोन एजंसींनी काम हाती घेतले आहे. पुढील सात ते आठ दिवसांत सुसूत्रता येईल व कचरा समस्या निश्चित दूर होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
नागरिक संवाद वाढविणारनागरिकांशी योग्य संवाद झाला तर प्रशासनाच्या कार्यालादेखील गती येते. त्यामुळेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल. साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून याची सुरुवात होईल. शिवाय ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी यांच्याशीदेखील संवाद साधण्यावर भर राहणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
शौचालयांसाठी महापौर निधी देऊमहापौर निधी म्हणून पाच कोटींचा निधी राखीव असतो. साधारणत: प्रभागातील विविध कामांसाठी नगरसेवक हा निधी मागतात. परंतु मी हा निधी कुठल्याही इतर कामासाठी कुणाही नगरसेवकाला देणार नाही. मात्र जर सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीसाठी कुणी निधी मागितला तर त्याला मदत करण्यात येईल. शहरात शौचालयांची आवश्यकता आहे. या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्यात येईल व पुढील काळात शहरात ५० सार्वजनिक शौचालये उभारण्यात येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
महापौरांचे ‘व्हिजन’
- शहराच्या स्वच्छतेवर भर देणार
- शहरात थुंकण्यावरील दंड वाढविणार
- शहरातील बगिच्यांमध्ये १५ दिवसांत जबाबदार अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक लावणार.
- २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान १०० ठिकाणी तक्रारपेटी लावणार.
- २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान दहाही झोनमध्ये नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणार
- भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर विशेष भर राहणार.
- स्वयंसेवी संस्थांची ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’मधून मते जाणून घेणार
- सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार.
- अतिक्रमणासंदर्भात गंभीरतेने कारवाई करणार.
- जनता-प्रशासन संवाद वाढविणार.