लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेना संक्रमण झपाट्यानेे वाढत असल्याने कळमेश्वर येथील तहसील कार्यालय अभ्यागतांसाठी मंगळवार(दि. १३)पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये घेण्यात आला असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या, अर्ज व निवेदन ऑनलाईन पाठवावेत तसेच प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, अशी माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली.
कळमेश्वर तालुक्यातील अनेकांना हा निर्णय माहीत नसल्याने नागरिक त्यांच्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात आणि प्रवेशद्वारावर लावलेले सूचनेचे फलक वाचून घरी परत जात आहेत. मागील काही दिवसात कळमेश्वर-ब्राह्मणी शहर व तालुक्यातील काही गावांमध्ये काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे संक्रमण राेखण्यासाठी तालुक्यात रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू पडू नये, मास्क वापर, फिजिकल डिस्टन्सिंगची सक्ती, हात साबणाने स्वच्छ धुणे, लक्षणे आढळून आल्यास न घाबरता टेस्ट करवून घेणे, स्वत: लस घेणे व इतरांना लस घेण्यास प्रेरित करणे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, आराेग्य व पाेलीस विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर बंदी घालण्यात आली असून, प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये तहसील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी सूचना प्रवेशद्वाराजवळ लावली आहे.
...
नागरिकांचे हेलपाटे
सामान्य नागरिक विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र, जात व उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच इतर दाखल्यासाठी तहसील कार्यालयात येतात. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेला प्रवेशबंदीचा फलक वाचून परत जातात. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च हाेत आहे. दुसरीकडे, काेराेनामुळे कार्यालयीन कामाचा वेगही मंदावला आहे. कळमेश्वर तहसील कार्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असून, या काळात नागरिकांनी त्यांचे अर्ज व निवेदने ऑनलाईन सादर करावी, अशी माहिती नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी दिली.