जलालखेडा: गत दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आषाढी एकादशीच्या पर्वावर तालुक्यात हजेरी लावली. मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
दोन आठवड्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. दमट हवामान आणि उन्हाळामुळे पिके कोमेजली होती. पाऊस नसल्याने कपाशीला खात टाकणे, निंदने, फवारणीची कामे थांबली होती. आणखी ३ ते ४ दिवस पाऊस लांबला असता तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. मात्र पावसासाठी विठ्ठलाकडे साकडे घातलेल्या शेतकऱ्यांना आषाढीच्या पर्वावर दिलासा मिळाला. तालुक्यात मंगळवारी आणि बुधवारी सर्वदूर पाऊस झाला. पाऊस नसल्याने मजुरांना काम नव्हते. खत आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने बाजारपेठही मंदावली होती.
-
जूनच्या पूर्वार्धात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीवर भर दिला. मात्र अर्धा जुलै कोरडा गेला. त्यामुळे पिके वाळायला लागली होती. आणखी ४ ते ५ दिवस पाऊस नसता तर खरीप हंगाम संकटात आला असता.
दिलीप झरकर, शेतकरी, मदना