नागपूर : स्वत:चा मुलगा, बहीण, बहिणीचा पती, मुलगी व सासू यांच्यावर सब्बलीने वार करून त्यांना क्रूरपणे ठार मारणारा सैतान विवेक गुलाब पालटकर (४१) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा बहुप्रतीक्षित निर्णय दिला. पालटकरच्या या रानटी कृत्यामुळे संपूर्ण नागपूरचा थरकाप उडाला होता.मृतांमध्ये कृष्णा विवेक पालटकर (५), अर्चना कमलाकर पवनकर (४५), कमलाकर मोतीराम पवनकर (४८), वेदांती कमलाकर पवनकर (१२) व मीराबाई मोतीराम पवनकर (७३) यांचा समावेश आहे. पालकटकर याने वरील पाच जणांची झोपेतच हत्या केली होती. या प्रकरणात आधी १५ एप्रिल २०२३ रोजी सत्र न्यायालयाने पालटकरला भादंविच्या कलम ३०२ (खून)अंतर्गत मरेपर्यंत फाशी व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. पालटकरने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून पालटकरचे अपील फेटाळून लावले.
पाच जणांचा खुनी क्रूरकर्मा विवेक पालटकरला फाशीच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:41 AM