बहीण, मुलासह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकर फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 11, 2023 03:26 PM2023-04-11T15:26:36+5:302023-04-11T15:27:59+5:30
सरकार पक्षाचा सत्र न्यायालयात युक्तीवाद : शिक्षेवर येत्या शनिवारी निर्णय
नागपूर : बहीण व चिमुकल्या मुलासह पाच जणांची क्रूरपणे हत्या करणारा नररुपी सैतान विवेक गुलाब पालटकर (४०) हा फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहे, असा युक्तीवाद ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. अभय जिकार यांनी मंगळवारी सत्र न्यायालयात केला.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी गेल्या १ एप्रिल रोजी आरोपी पालटकरला पाच जणांची हत्या करण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविले. त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, मंगळवारी आरोपीच्या शिक्षेवर सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तीवाद झाला. दरम्यान, ॲड. जिकार यांनी फाशीच्या शिक्षेवर भर दिला. हा दूर्मिळातल्या दूर्मिळ प्रकारात मोडणारा अतिशय गंभीर गुन्हा आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीची व विकृत मानसिकतेची व्यक्ती आहे. तो समाजाकरिता अतिशय घातक आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दया दाखविली जाऊ शकत नाही. करिता, त्याला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी ॲड. जिकार यांनी केली.
आरोपीचे वकील ॲड. ऋषिकेश ढाले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा दाखल देऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असा दावा केला. घटनेच्या वेळी आरोपी केवळ ३५ वर्षे वयाचा होता. आरोपीला वयोवृद्ध आहे आहे. ती आरोपीवर अवलंबून आहे. त्यामुळे आरोपीला सुधारण्याची संधी देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. फिर्यादी केशव पवनकरचे वकील ॲड. मो. अतिक यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
अशी आहे घटना
मृतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (४८), त्यांच्या पत्नी अर्चना (४५), आई मीराबाई (७३), मुलगी वेदांती (१२) व भाचा कृष्णा (५) यांचा समावेश आहे. अर्चना ही आरोपीची बहीण तर, कृष्णा हा मुलगा होता. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. आरोपी विवेकला पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीला पैसे मागत होते. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून आरोपीने ११ जून २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर संबंधित पाचही जनांचा निर्घृण खून केला.