नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या ‘सिम्युलेशन’ स्पर्धेत ‘व्हीएनआयटी’च्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा रोवला. विविध देशातील ६३१ चमूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतातून एकमेव प्रतिनिधित्व असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या चमूला चौथे स्थान मिळाले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भारतीय महाविद्यालयाची चमूची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. ऋषिकेश काकडे व वासव कौशिक या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले.
अमेरिकेत डिसेंबर २०२० मध्ये ही ‘समिओ इंटरनॅशनल’ स्पर्धा घेण्यात आली होती. या दोन्ही विद्यार्थ्यांनी ‘बी.टेक.’ अंतिम वर्षाच्या प्रकल्पावर आणखी पुढे काम करत प्रकल्प तयार केला व त्याचे या स्पर्धेत सादरीकरण केले. जगभरातून ६३१ चमूंच्या माध्यमातून २ हजार ३३९ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, चीन, स्पेन, स्वित्झर्लंड, कॅनडा यांच्यासह २० देशातील विद्यार्थी होते. प्रकल्प सादरीकरणाचा दर्जा, सुस्पष्टता, ‘डाटा’चे विश्लेषण, मॉडेलची सखोलता, अॅनिमेनशचा दर्जा, निकालाचे विश्लेषण इत्यादी बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात आले. १२ जानेवारी रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला. डॉ. नितीन कुमार लौतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रकल्प पूर्ण केला.