गणेश वासनिक अमरावती : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांमुळे त्यांचा अधिवास, जिविताला धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने काढला (एनटीसीए) आहे. त्यामुळे आता व्हॉट्स अॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल करू नयेत, असे निर्देश व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रीय संचालकांना एनटीसीएने दिले आहेत.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने १७ जून २०१७ रोजी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांना पाठविलेल्या पत्रात वाघांचे अधिवास धोक्यात आल्याची बाब स्पष्ट केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या वाघांचे छायाचित्रांमुळे अधिवास, संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते छायाचित्र क्षणात विविध समूहांवर अपलोड होतात. त्यामुळे वाघ कोणत्या जंगलातील आहे, त्याचा अधिवास, संरक्षण आदींबाबतची माहिती सोशल मीडियातून प्रसारित होते. ही माहिती शिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर ते शिकारीसाठी सूक्ष्म नियोजन करून वाघांची शिकार करतात, असा अहवाल यापूर्वीच सीबीआयने तपासाअंती केंद्र सरकारला दिला आहे. परिणामी वन्यजीव क्षेत्रात कार्यरत एनजीओ तथा वनाधिकाऱ्यांनी वाघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत, असे निर्बंध एनटीसीएने लावले आहेत. वाघांचा अधिवास कुठे, जंगलाचे नाव, वर्णन आदी माहिती राखीव वनक्षेत्राबाहेर जाता कामा नये, ही बाब केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. तसेच वन्यजीव क्षेत्रात कार्यरत एनजीओंनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची परवानगी न घेता राखीव जंगल, अभयारण्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशा सूचना एनटीसीएच्या आहेत. सीबीआयने यापूर्वी विदर्भात वाघ शिकारीच्या घटनेनंतर तपासादरम्यान वाघांचे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जंगलातील माहिती ही शिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. या आधारावरच एनटीसीएने सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र प्रसारित करण्यास मनाई केली आहे.वाघांचे प्रोफाईल गोपनीय ठेवाराष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार, वाघांचे प्रोफाईल, हिस्ट्री ही वन्यजीव विभागाला गोपनीय ठेवावी लागेल. वाघांचे वर्णन किंवा त्यांच्याविषयी माहिती सार्वत्रिक करता येणार नाही. वाघ कोठून आला, अधिवास, वय, वर्णन आदी बाबी यापुढे सार्वत्रिक होता कामा नये, असेही एनटीसीचे सहायक निरीक्षक डॉ. वैभव माथूर यांनी म्हटले आहे.वाघांचे छायाचित्र व्हॉट्स अॅप, फेसबुकवर व्हायरल होऊ नये, या एनटीसीएच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करू. एनजीओंच्या जंगल प्रवेशावरही निर्बंध लादले जातील.- एम.एस.रेड्डी,क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
व्हॉट्स अॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल करण्यास मनाई
By admin | Published: June 19, 2017 5:57 PM