लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपले मतदान लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील असलेल्या रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनामध्येसुद्धा १० ते २५ टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी शुक्रवारी दिली.मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व नागरिकांना रामटेक उपविभाग प्रशासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार महत्त्वाच्या सर्व हॉटेल व रिसॉर्टमध्ये मतदानानंतर म्हणजेच २१ ऑक्टोबरनंतर पुढील १५ दिवस ही सवलत राहणार आहे. यासाठी मतदारांना आपला मतदानाचा पुरावा म्हणून आपले शाई लावलेले बोट दाखविणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ मतदान केलेल्याच मतदारांसाठी राहणार आहे.पेंच परिसरातील महत्त्वाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिल्लारी येथील रिसॉर्ट, सिल्लारी येथील अमलताश, पिपरिया येथील गो फ्लेमिंगो रिसॉर्ट, श्रुष्टी जंगल होम सिल्लारी, तुली, वीरबाग, (बांद्र्रा) टायगर कॅरिडॉर (पेंच), खुर्सापार, ऑलिव्ह व्हिला, पेंच, ऑलिव्ह रिसॉर्ट, खिंडसी व राजकमल बोटींग सेंटर, खिंडसी, रामधाम, मनसर तसेच कर्माझरी येथील ऑलिव्ह व्हिला येथे २१ ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून १५ दिवस पर्यटकांना जेवणावर १० ते २० टक्के तसेच राहण्यावर १० ते २५ टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे.जिल्हा प्रशासन व रामटेक उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने रामटेक परिसरातील महत्त्वाच्या हॉटेल्स व रिसॉर्ट चालकांची बैठक रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मतदार जागृती अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये पेंच परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेल येथे मतदानाच्या नंतर पुढील १५ दिवस १० ते २५ टक्केपर्यंत पर्यटकांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावून पेंच परिक्षेत्रातील जंगल पर्यटनाचा तसेच निवास व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय महसूल जोगेंद्र कट्यारे यांनी केले आहे.
मतदान करा, रिसॉर्टमध्ये जा! पेंचमधील हॉटेल व रिसॉर्टमध्ये २५ टक्के सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:15 AM
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील असलेल्या रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनामध्येसुद्धा १० ते २५ टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी शुक्रवारी दिली.
ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम