नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत मतदारांना भुलविण्यासाठी कुठल्याही वस्तू, पैशांचे वाटप करता येत नाही असा नियम आहे. मात्र, उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी रेशन किट तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत मोतीबाग सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका क्वॉर्टरच्या मोकळ्या भागातून २२० किट बॅग्ज जप्त केल्या आहेत. या बॅग्जमध्ये नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रक आढळले आहे. नागपूर-पश्चिमच्या उमेदवाराच्या नावाचा साठा नागपूर-उत्तर मतदारसंघात आढळल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोतीबाग येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका क्वॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रेशन किट असल्याची माहिती निवडणूक आयोगाला एका व्यक्तीने दिली. भरारी पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता क्वॉर्टरच्या मोकळ्या भागात २२० किट बॅग्ज असल्याची बाब स्पष्ट झाली. तातडीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या पथकालादेखील बोलविण्यात आले. या बॅग्जची पाहणी केली असता त्यात नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रकदेखील आढळून आले. हा सर्व माल जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचविण्यात आला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती. या मालाचा पंचनामा झाल्यावर तक्रार होईल व नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल, अशी माहिती जरीपटका पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरुण क्षीरसागर यांनी दिली. यासंदर्भात नरेंद्र जिचकार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.सरकारी क्वॉर्टरमध्ये किट्स कशा ?संबंधित क्वॉर्टर रेल्वेचे होते व ते एका कर्मचाऱ्याला अलॉटदेखील झालेले आहे. त्या क्वॉर्टरसमोर मोकळी जागा असून तेथेच रविवारी एका गाडीतून रेशन किट्स उतरविण्यात आल्या. त्यानंतर याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. सरकारी परिसराचा अशा पद्धतीने वापर करणे हादेखील आचारसंहितेचा भंग असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.उत्तरमध्ये साठा का ?दरम्यान, नरेंद्र जिचकार हे नागपूर-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार असताना त्यांच्या नावाच्या किट बॅग्ज नागपूर-उत्तरमधील भागात कशा काय ठेवण्यात आल्या याची चौकशी सुरू आहे.