नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे संघटन मजबुतीवर भर देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या निमित्ताने रविवारी शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षातर्फे मोठे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे राज्यपातळीवरील मोठ्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणी उपस्थिती होती. ‘मन की बात’नंतर प्रत्येकच ठिकाणी नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना अनौपचारिक चर्चेत जनसंपर्क व संवादावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचना केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी. रवी, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, विदर्भ प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर इत्यादी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. फडणवीस हे पूर्व नागपुरातील वर्धमाननगर स्थित बूथप्रमुखांद्वारे आयोजित ‘मन की बात’ला उपस्थित होते.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान चौकात चंद्रकांत पाटील, उत्तर नागपुरातील जरीपटक्यात सुधीर मुनगंटीवार, दक्षिण नागपुरातील अयोध्या नगरात आशिष शेलार हे शहरातील आमदार, पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांची ‘मन की बात’ कार्यकर्त्यांसोबत ऐकल्यानंतर त्यांच्या भाषणातील मुद्दे नेत्यांनी उपस्थितांसमोर मांडले. याशिवाय तेथील बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांशी या नेत्यांनी अनौपचारिकपणे चर्चादेखील केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सशक्त बूथ मोहीम सुरू केली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील कमकुवत बूथ ओळखून तेथे मजबुतीवर कसा भर द्यावा याबाबत नेत्यांनी यावेळी मुद्दे मांडले. तसेच केंद्र शासनाचे निर्णय, योजना यासंदर्भात नागरिकांशी जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्यक्ष संवाद करण्यावर भर देण्याच्या सूचनादेखील नेत्यांनी यावेळी दिल्या.
प्रदेशाध्यक्ष दुपारीच रवाना
राष्ट्रवादीच्या नेत्या व खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सायंकाळपर्यंत नागपुरात थांबतील, असा कयास होता. परंतु ‘मन की बात’चा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी भेट दिली. तेथून देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन काही वेळ चर्चा केली व ते मुंबईला रवाना झाले.