लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतदारांपर्यंत त्यांचे मतदार कार्ड पोहोचत नसल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे आता नवमतदारांचे ओळखपत्र त्यांना स्पीड पोस्टानेच पाठवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
देशपांडे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावती विभागाचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.
देशपांडे यांनी सांगितले. नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. कारण त्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणीच केलेली नाही. अशा तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात विविध शिबिरे आयोजित केली जातील. १३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी वंचित घटक, दिव्यांग कामगार यांच्या मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. येत्या १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा होतील. यात गावातील तरुण मतदारांची नोंदणी तसेच लग्न हाेऊन गावात येणाऱ्या नवविवाहितेची नोंदणी. कुणी लग्न होऊन गावाबाहेर गेली असेल तर त्यांचे नाव कमी करणे, आदी कामे केली जातील.
दुहेरी नाव नोंदणी असलेल्यांची संख्या ५ लाखावरून १३ हजारावर
राज्यात एकाच व्यक्तीचे दोन व त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदणी असलेले तब्बल पाच लाखावर लोक होते. मतदार यादी अद्ययावत कार्यक्रमांतर्गत अशा लोकांचा शोध घेण्यात आला. अशा लोकांची संख्या आता केवळ १३ हजारापर्यंत राहिली आहे. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन मतदानाची संकल्पना चांगली, पण संपूर्ण अभ्यास करावा लागेल
मतदाराला ऑनलाईन मतदान करता यावे, ही संकल्पना चांगली आहे. परंतु सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. मी स्वत: यासंदर्भात एनआयसीसोबत चर्चा केली. ही संकल्पना चांगली असली तरी अगोदर आपल्यास्तरावर त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. हा संपूर्ण तांत्रिक विषय आहे. तो सरसकट लागू करता येणे शक्य नाही, असे देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.