नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य नागो गाणार यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार असून, ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
मागील वर्षी ३५ हजारांच्या जवळपास मतदार नोंदणी झाली होती. यावर्षी त्यापेक्षा अधिक नोंदणी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याकरिता सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार असून, जनजागृतीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हायस्कूलमध्ये मागील सहा वर्षांत तीन वर्ष शिक्षण सेवेत असणाऱ्यास मतदार होता येणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.
- मतदार नोंदणी कार्यक्रम - १ ऑक्टोबर
- प्रथम प्रसिद्धी - १५ ऑक्टोबर
- द्वितीय प्रसिद्धी - २५ ऑक्टोबर
- हरकती व दावे स्वीकारणे - ७ नोव्हेंबर
- प्रारुप मतदार यादी छपाई - १९ नोव्हेंबर
- प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध - २३ नोव्हेंबर
- दावे व हरकती स्वीकारणे - ९ डिसेंबरपर्यंत
- दावे, हरकती निकाली काढणे - २५ डिसेंबर
- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - ३१ डिसेंबर