काँग्रेस, शिवसेनेपासून दुरावले मतदार : बंडखोरांना बसली फटकार मंगेश व्यवहारे नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागो गाणार यांच्या विरोधात झालेली बंडखोरी, राजकीय पक्षांनी रिंगणात उतरविलेले उमेदवार, मतदार नोंदणीत कमी झालेले मतदार, निवडणुकीत वाढलेले उमेदवार आणि शिक्षक संघटनांनी राजकीय पक्षांच्या विरोधात केलेला प्रचार या सर्व पार्श्वभूमीवर नागो गाणार येणार की जाणार, याबाबत साशंकताच होती आणि तसे झालेही. गाणार पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजयी होईल, असा दावा भाजपाने केला होता. परंतु मतमोजणीत गाणारानांच घाम फुटला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये गाणार १० हजार ३२ वर पोहचले. परंतु विजयासाठी ठरलेल्या कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये पहिले दोन उमेदवार येईपर्यंत झालेल्या मतमोजणीत गाणार १२०३९ मतांवर पोहचले. शेवटी निवडणूक आयोगाने दोन उमेदवारांच्या मतांची तफावत लक्षात घेता, गाणारांना विजयी घोषित केले. गाणारांच्या विजयावर विरोधकांनी ‘मतदारांनी हरविले, नशिबाने जिंकविले’ असा उपरोधिक टोला हाणला. गाणार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बळावर मते मिळाली. मग गाणार यांनी स्वत:च्या बळावर किती मते मिळविली, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात यावर्षी पहिल्यांदाच चुरस बघायला मिळाली. यासाठी मुख्य कारण ठरले, राजकीय पक्षांनी केलेला हस्तक्षेप. यापूर्वी पक्षांचे उमेदवाराला केवळ समर्थन मिळायचे. परंतु पहिल्यांदा पक्षाने आपले अधिकृत उमेदवार उतरविले. त्यातच उमेदवाराने स्वत: काम केले. गाणारांच्या बाबतीत सुरुवातीपासूनच असंतोष होता. विभागामध्ये गाणारांच्या बाबतीत तीव्र असंतोष होता. त्यांच्या सहा वर्षाच्या कामावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ते कुणाशीही संपर्क ठेवत नव्हते, हेकड वागत होते, कोणतेही काम करताना पदाधिकाऱ्यांशी त्यांनी समन्वय ठेवला नाही. त्यांची कार्यशैली एकाधिकारशाहीची होती. अशा प्रतिक्रिया शिक्षक परिषदेतूनच उमटत होत्या. त्यामुळे गाणारांची उमेदवारी जाहीर होताच, शिक्षक परिषदेतून बंडखोरी उभी ठाकली. त्यांच्यामुळे त्रस्त झालेले संघप्रणीत संघटनेतून संजय बोंदरे हे अपक्ष म्हणून उभे राहिले. विभागीय शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गाणारांकडे पाठच फिरविली होती. पण ऐनवेळी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी गाणारांच्या पाठीशी उभे राहून, अख्खा पक्ष कामाला लावला. भाजपने गाणारांच्या मागे प्रतिष्ठापणाला लावताच, काँग्रेस पक्षालाही खुमखुमी सुटली. या मतदारसंघात काँग्रेसने विमाशिशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून अनिल शिंदे यांना रिंगणात उतरविले. राज्यभरात भाजपा-शिवसेनेत सुरू असलेला वाद लक्षात घेता, भाजपाची गच्छंती करण्यासाठी शिवसेनेने स्वतंत्र चूल मांडली. माजी खासदार प्रकाश जाधव यांना शिक्षक मतदारसंघात उमेदवारी घोषित केली. सर्व मुख्य पक्ष मतदारसंघात उतरल्यानंतरही शिक्षक संघटनांनीही आपला जोर आजमावला. शिक्षक भारतीने तर प्रचारात पक्ष विरुद्ध संघटना असाच प्रचार सुरू केला. काँग्रेसने घोषित केलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या शिक्षक सेल पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसने प्रदेश महासचिव बबनराव तायवाडे यांनी शिंदेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तिकडे काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष मनोज पाटील यांनी मतदारसंघात ठिय्याच मांडला. राजेंद्र झाडे यांच्या प्रचारासाठी आमदार कपिल पाटील यांनीसुद्धा कंबर कसून तीन दिवसीय दौरा नागपूर विभागात केला. रिंगणात असलेले १६ उमेदवार, झालेले मतदान यावरून कारेमोरे, गाणार, झाडे, शिंदे अशा चौरंगी लढतीची चर्चा रंगली होती. निकाल बाहेर येताच, शिक्षकांनी पहिल्या पसंतीत गाणारांना सर्वाधिक पसंती दिली. संघाचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या बोंदरेंना ६२ वरच आटोपले. काँग्रेसने दाखविलेला जोर तीन हजाराच्या आतच संपला. गाणारांची डोकेदुखी ठरणारे बंडखोर बिजवारांना चार अंकापर्यंतही पोहचता आले नाही. एका मताबरोबर एक रुपया देऊन १० हजाराची चिल्लर अर्ज भरताना दिलेल्या बल्लमवार यांना १९० शिक्षकांची मते दिली. महाराष्ट्रात सर्वात मोठी असलेली विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उमेदवाराला संघटनेच्याच सदस्यांनी पाठ दाखविली. अशात शिक्षक भारतीच्या उमेदवाराने चांगलीच मुसंडी मारली. पहिल्या पसंतीत पाच हजारावर मते त्यांनी पदरात पाडली. गाणार निवडणुकीत नशिबाने जिंकले असले तरी, गाणारांच्या कार्यपद्धतीवर आजही शिक्षकांचा आक्षेप आहे. येत्या सहा वर्षात गाणारांनी आपल्या क ार्यशैलीत बदल न केल्यास, पक्षाला उमेदवार बदलवावा लागण्याची शक्यता आहे. गाणार जरी माझ्या कामावर शिक्षकांनी विश्वास दाखविल्याचा दावा करीत असले तरी, त्यांच्या विजयाचा खरा शिल्पकार भाजप आहे. त्यामुळेच खऱ्या शिक्षक मतदारांकडून ‘शिक्षक हरले, राजकीय पक्ष जिंकले’, असा सूर आळवला जात आहे.(प्रतिनिधी) उमेदवारांना मिळालेली मते अनिल शिंदे - ३३४७ प्रकाश जाधव - ५९९ रवींद्रदादा डोंगरदेव - १२४८ राजेंद्र झाडे - ७१९९ आनंदराव अंगलवार - १०२ आनंदराव कारेमोरे - ५३०१ खेमराज कोंडे - ८६४ प्रेम गजभिये - १७७ नागो गाणार - १२०३९ चंद्रकांत गोहाणे पाटील - १४ अजर पठाण - ११७ विलास बल्लमवार - १९० शेषराव बिजवार - ९९६ संजय बोंदरे - ६२ अशोक लांजेवार - १४ अरुण हर्षबोधी - १०३७
मतदारांनी हरविले,नशिबाने जिंकविले!
By admin | Published: February 09, 2017 2:32 AM