कळमेश्वर : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांचे छायाचित्र नाही, अशा मतदारांना यादीतून वगळले जाणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली.
१ जानेवारी २०२१ राेजीच्या दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे निरंतर प्रक्रियेंतर्गत तालुक्यातील मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची चौकशी करण्यात आली. ज्या मतदारांचे कायमस्वरूपी स्थानांतरण झाले, मुलीचे लग्न झाले, मतदार यादीतील पत्त्यावर मतदार राहत नाही, मृत मतदार आदींचे पंचनामे तयार करण्यात आले आहे. यात तालुक्यातील मतदार यादीत ९०५ मतदारांचे छायाचित्र नव्हते. त्यापैकी १९६ मतदारांचे छायाचित्र प्राप्त झाले आहे. उर्वरित ७०९ मतदारांची यादी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या कार्यालय वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तालुक्यातील मतदारांनी यादीतून नाव वगळणे कारवाईअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या पंचनाम्याची यादी तपासून बघावी. सदर यादीत ज्यांचे नाव आले असल्यास आपले दावे व हरकती तहसील कार्यालयास सादर कराव्यात. अन्यथा यादीतील नाव वगळण्याबाबत आपला काही आक्षेप नाही, असे गृहित धरून मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गड्डम, लिपिक बिलाल खान यांनी दिली.