लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती किती मोठा आणि कुणीही असला तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला.११ एप्रिलला देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात दिग्गज नेत्यांमध्ये लोकसभेची लढत होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे येथील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात स्ट्राँग रूम क्लिपिंग, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधान करून उठलेल्या वादाने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांसोबत लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, निवडणुकीवर लक्ष ठेवून काही उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्यावर आमची नजर आहे. अशावेळी परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. उपद्रवींना वठणीवर आणण्यासाठी आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी शहर पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. सहा हजार पोलीस, १००० अधिकारी, १५०० होमगार्डस् बंदोबस्तात तैनात आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी मदतीला आहेत. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे. स्ट्राँग रूम, संवेदनशील वस्त्या आणि मतदान केंद्रांवर नागपुरात निवडणुका शांततेत पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना कुणी खीळ घालण्याचा प्रयत्न केला किंवा मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्या व्यक्तीची गय केली जाणार नाही. तो व्यक्ती कुणीही असो, कितीही मोठा असो त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला थेट कारागृहात डांबले जाईल, असा इशाराही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दिला.निवडणूक बंदोबस्त : झोपडपट्ट्यांमध्ये वर्दळ वाढलीसंवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. झोपडपट्टीत जाऊन आमिष दाखवून किंवा धाक दाखवून मते प्रभावित करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरातील विविध भागात झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग केले जात आहे. पाचपेक्षा जास्त मंडळी रात्री ९ नंतर कोणत्या झोपडपट्टीत शिरत असेल तर त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्याचे, तपासणी करून त्यांचा तेथे जाण्याचा हेतू तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, कुणी राजकीय दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची भिडमुर्वत बाळगू नका, असेही पोलिसांना सांगण्यात आले आहे. पुढच्या काही तासात धडक मोहीम राबवून दारू विक्रेत्यांना जेरबंद केले जाणार आहे.बंदोबस्तातील मनुष्यबळ६ हजार पोलीस१ हजार अधिकारी१५०० होमगार्डस्१०० सीआयएसएफचे जवान१०० एसआरपीएफचे जवान२ शीघ्र कृती दल, मुख्यालयातही राखीव पोलीस