लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी झाली आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पहिल्या फेरीचे निकाल सव्वा तासात मिळेल म्हणजेच सकाळी ९.१५ पर्यंत मतदानाचा नेमका ट्रेंड काय आहे, हे समजू लागेल.नागपूर लोकसभा मतदार संघात एकूण ५४.७४ टक्के मतदान झाले असून २१ लाख ६० हजाप्र २३२ मतदारांपैकी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर रामटेक लोकसभा मतदार संघात ६२.१२ टक्के मतदान झाले असून १९ लाख २१ हजार ४७ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरतील ३० तर रामटेकमधील १६ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. कुणाला किती मत मिळाले, विजयी कोण होणार? विजयी उमेदवार किती मताधिक्याने निवडून येणार याबाबत सध्या तर्कवितर्क लढवले जात आहे. २३ मे रोजी याला पूर्णविराम लागेल.अशी असेल व्यवस्थाचिखली ले-आऊट कळमना येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतमोजणी येथेच होईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. विधानसभा मतदार संघानुसार मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल राहतील.पोस्टल बॅलेटची मोजणीही सोबतचपोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवातीलाच होईल. मतमोजणी आणि पोस्टल बॅलेटची मोजणी एकाचवेळी सुरु होईल. पहिल्या फेरीला किमान सव्वा ते दीड तासाचा वेळ लागेल. त्यानंतरची प्रत्येक फेरी ही २५ ते ३० मिनिटे लागतील.व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी सर्वात शेवटीमतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदार संघातून ५ मतदान केंद्रावरील अशा एकूण ३० मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्यात येणार आहे. केंद्राची निवड ही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चिठ्ठीद्वारे करतील. व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी ही सर्वात शेवटी होईल.