लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले असून, मतमाेजणीला कामठी तहसील कार्यालयाच्या आवारात साेमवारी (दि. १८) सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात हाेणार आहे. त्यासाठी सात वेगवेगळ्या टेबलची निर्मिती करण्यात आली असून, ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही मतमाेजणी पाच फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली.
कामठी तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमधील ८५ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. तहसील कार्यालयाच्या आवारात साेमवारी मतमाेजणी केली जाणार असून, पहिली फेरी सकाळी १० वाजता सुरू हाेईल. पहिल्या फेरीत काेराडी ग्रामपंचायतीची मतमाेजणी केली जाणार असून, दुसऱ्या फेरीत लोणखैरी व महालगाव, तिसऱ्या फेरीत टेमसना व खेडी, चौथ्या फेरीत घोरपड व पावणगाव, पाचव्या फेरीत केसाेरी व भामेवाडा ग्रामपंचायतीची मतमोजणी केली जाईल. त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मतमाेजणीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कामठी (नवीन)चे ठाणेदार सतीश मेंढे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त लावण्यात येणार आहे, असेही अरविंद हिंगे यांनी सांगितले.