नागपूर : नागपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहरात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून पूर्व नागपुरातील वृंदावननगर येथील नागरिकांना मूलभुत सुविधांसाठी लढा द्यावा लागत आहे. येथील नागरिकांना दूषित पाणी, गडरलाईनची समस्या, कचरा आदी समस्यांसाठी महापालिकेत चकरा माराव्या लागत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून महापालिकेने तातडीने लक्ष पुरवून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
वृंदावननगर परिसरातील नागरिकांच्या नळाला दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. गडरलाईन आणि नळलाईनचे पाईप एकाच ठिकाणावरून गेल्यामुळे गडरलाईनचे पाणी नळाच्या पाईपमध्ये शिरते. गडरलाईनही वारंवार चोक होते. याबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. गडरलाईन जाम होत असल्यामुळे परिसरातील विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने या भागातील गडरलाईन बदलविण्याची मागणी होत आहे.
मैदानातील कचऱ्यामुळे पसरते दुर्गंधी
वृंदावननगरात एक मोठे मैदान आहे. परिसरातील नागरिक या मैदानात कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या मैदानात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. मैदानातील कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करण्याची मागणी होत आहे. या भागातील वेस्ट वॉटरचे चेंबर तुटलेले असल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहते. परिसरात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. या भागात अनेक नागरिकांनी आपल्या घराचे बांधकाम रस्त्यापर्यंत केले असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
असामाजिक तत्त्वाचा उपद्रव
वृंदावननगर परिसरात असामाजिक तत्त्वाचा उपद्रव वाढत आहे. परिसरात असलेल्या सार्वजनिक मैदानात हे असामाजिक तत्त्व मद्य प्राशन करणे, जुगार खेळत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा मनस्ताप होत आहे. या भागातून जाणाऱ्या महिलांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागते. या मैदानात सायंकाळच्या वेळी प्रेमीयुगुल येत असल्यामुळे वस्तीतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवून असामाजिक तत्त्वाचा बंदोबस्त करण्याची मागणी वृंदावननगर परिसरातील नागरिक करीत आहेत.
गडरलाईन दुरुस्त करावी
‘गडरलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील गडरलाईन बदलून नवी गडरलाईन टाकण्याची गरज आहे.’
-रवींद्र कुमार बावनकर, नागरिक
स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा
‘परिसरात नागरिकांच्या नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही कारवाई करण्यात आली. त्यामुळे महानगरपालिकेने नळाला स्वच्छ पाणी पुरवठा करावा.’
-अश्विन निकुडे, नागरिक
मैदानातील कचरा उचलावा
‘सार्वजनिक मैदानात नागरिक कचरा आणून टाकतात. त्यामुळे या भागात नेहमीच दुर्गंधी पसरते. मैदानात पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे डासांचा उपद्रव होतो. त्यामुळे महापालिकेने या मैदानातील कचरा उचलण्याची गरज आहे.’
-मंगला कढव, महिला
फूटपाथची व्यवस्था करावी
‘वृंदावननगरात फूटपाथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागात त्वरित फूटपाथची व्यवस्था करणे आवश्यक आहे.’
-ऋषी हर्षे, नागरिक
असामाजिक तत्त्वाचा बंदोबस्त महत्वाचा
‘परिसरात असलेल्या सार्वजनिक मैदानात असामाजिक तत्त्वाचा उपद्रव वाढला आहे. मैदानात असामाजिक तत्त्व मद्य प्राशन करणे, जुगार खेळतात. त्यामुळे महिलांना सायंकाळच्या वेळी तेथून जाणे कठीण होते. त्यामुळे या भागातील असामाजिक तत्त्वाचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.’
-प्रियंका रामटेके, महिला
विहिरींची सफाई करावी
‘गडरलाईनचे पाणी विहिरीत शिरत असल्यामुळे वृंदावननगर परिसरातील विहिरी दूषित होत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील विहिरींची सफाई करण्याची गरज आहे.’
-रश्मी लांडगे, महिला
..................