लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनव्रती पुरस्कार’ सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य संघातर्फे दर दोन वर्षांनी कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डाॅ. मनाेहर यांना त्यांच्या लेखनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वाङ्मय पुरस्कारासोबतच महाराष्ट्र फाऊंडेशन, सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मारवाडी फाऊंडेशन पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, सुगावा पुरस्कार इत्यादी सुमारे २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सूर्यकुळाशी नाते सांगणारी कविता म्हणून यशवंत मनोहर यांच्या कवितेचा गौरव केला जातो.
विदर्भ साहित्य संघातर्फे दिला जाणारा कै. माडखोलकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी कविवर्य ग्रेस, महेश एलकुंचवार, म.म.देशपांडे, सुरेश भट, मारुती चितमपल्ली, प्राचार्य राम शेवाळकर, वसंत आबाजी डहाके, आशा बगे आणि डॉ. वि.स.जोग या मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. १४ जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनी डॉ. यशवंत मनोहर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे विदर्भ साहित्य संघाने कळविले आहे.