नागपूर : भारतात ६ भारतीय व ३ स्थलांतरित अशा ९ प्रजातींच्या गिधाडांचे अस्तित्व आहे. १९८० च्या दशकापर्यंत देशात गिधाडांची संख्या ४० दशलक्ष पेक्षा अधिक हाेती. मात्र डायक्लाेफेनॅक सारख्या विषारी औषधामुळे अवघ्या १५-२० वर्षात ९० टक्के गिधाडे संपली. काही प्रजातीतर नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्ग निराेगी ठेवणाऱ्या या निसर्ग मित्रालाच आता वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वनविभाग आणि कार्बेट फाउंडेशन यांच्या वतीने गिधाड संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी माहितीपर पाेस्टर प्रदर्शित केले आहे. वनविभाग, पशुसंवर्धन विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून पाेस्टरच्या माध्यमातून गिधाड वाचविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
एका माहितीनुसार १९९३ ते २००७ दरम्यान भारतीय प्रजाती असलेल्या पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाडांची संख्या ९९.९ टक्के नष्ट झाली. याशिवाय भारतीय गिधाड व निमुळत्या चाेचीचे गिधाडा या प्रजातींची ९९ टक्के संख्या कमी झाली आहे. यासह लाल डाेक्याचे गिधाड व इजिप्शियन गिधाड या प्रजाती ही धाेकादायक स्थितीत पाेहचल्या आहेत. स्थलांतरित प्रजाती असलेल्या काळे गिधाड, ग्रिफाेन गिधाड आणि हिमालयीन गिधाड या प्रजातींची स्थितीही वाईट झाली आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटी तर्फे १९९० च्या दशकापासून केलेल्या अभ्यासात विषारी औषधामुळे गिधाडांवर नामशेष हाेण्याची परिस्थिती ओढावली असल्याचे स्पष्ट केले हाेते व त्यानंतर २००६ मध्ये डायक्लाेफेनॅकवर बंधन लावण्यात आली हाेती. मात्र आजच्या अवस्थेत गिधाडांना वाचविण्यासाठी अनेक स्तरावरून उपाययाेजना करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
डायक्लाेफेनॅक बंद, इतर औषधी सुरुच
माणसे वापरत असलेल्या डायक्लाेफेनॅक औषधाचा जनावरांवर उपचारासाठी ही उपयाेग केला जायचा. या औषधाचा अल्पसा अंश ही २४ तासांत गिधाडांच्या मृत्यूस कारणीभूत ठरताे. २००६ मध्ये या औषधावर बंदी लावण्यात आली. मात्र तरीही वापर हाेत असल्याने २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या उत्पादनावर बंदी घातली. डायक्लाेफेनॅकवर बंदी लावली असली तरी इतर ‘नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स’चा वापर केला जाताे आणि या औषधांचा ही गिधाडांसाठी तेवढ्याच धाेकादायक आहेत. जनावरांच्या रुग्णालयात या औषधांचा वापर बंद हाेईपर्यंत गिधाडांचे संवर्धन हाेणे शक्य नाही, असे काॅर्बेट फाउंडेशनचे केदार गाेरे म्हणाले.
गडचिराेली पॅटर्नची गरज
राज्यात गडचिराेली, नाशिक आणि ठाणे येथे गिधाड रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे, जेथे गिधाडांना डायक्लाेफेनॅकमुक्त मांस खायला मिळते. हा पॅटर्न सर्वत्र राबविण्याची गरज आहे.
गिधाड प्रजनन केंद्र स्थापन हाेणार
२०२० ते २०२५ पर्यंतच्या भारतातील गिधाड संवर्धनाच्या कृती आराखड्यानुसार राज्य सरकार पांढऱ्या रंगाच्या गिधाडांसाठी बीएनएचएस, ईला आणि भारतीय गिधाड फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र वनविभाग गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.