कोराडी : महादुला येथील मागास भागात राहणाऱ्या अनेक मजुरांना सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. बीपीएल व एपीएलमध्ये समावेश असलेल्या अनेकांना राशन कार्ड अपडेट नसल्याचे कारण सांगून त्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्या जात असल्याने शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व या सर्व गोरगरिबांना तात्काळ मोफत धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी कामठीच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने सर्वांना मोफत अन्न देण्याची घोषणा केल्यानंतरही अनेक मजुरांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांचे राशन कार्ड अपडेट नसल्याचे सांगण्यात येते. शासनाने त्यांची समस्या तात्काळ सोडवावी व अन्नधान्य उपलब्ध करून द्यावा अन्यथा अशा अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. त्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. रंगारी यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, महादुला विभागात स्वस्त धान्याच्या दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. वेळेवर रेशन दुकाने उघडत नसल्याने रेशन कार्डधारकांना उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली जात नाही. दुकानासमोर उन्हापासून संरक्षण म्हणून सावलीसाठी कुठलीही व्यवस्था केली जात नाही. अनेक रेशन दुकानदार संबंधित रेशनधारकांना तुमचे थम्ब अपडेट नाही, असे सांगून मोफत धान्य देण्याचे टाळत असले तरी आम्ही तुम्हाला चार-पाच किलो अन्नधान्य देतो, असे सांगून सहानुभूती असल्याचे दर्शवितात व त्यांच्याकडून पैसे घेऊन अन्नधान्य दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती रंगारी यांनी दिली. मोफत धान्यासाठी त्यांना अडचण येत असेल तर मग त्यांच्याकडून पैसे घेऊन अन्नधान्य कोणत्या पद्धतीने दिले जाते याची चौकशी करण्याची मागणी रंगारी यांनी केली आहे.
मजुरी करणारे रेशन कार्डधारक मोफत अन्नधान्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:09 AM