नागपूर/उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. शेजारीच एक गाईचे वासरू मृतावस्थेत आढळले आहे. विषबाधेने या वाघांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात विषप्रयाेग करण्याच्या आराेपात शेजारील शेतमालकाला अटक करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाचवेळी वाघिण व बछडे मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहे.
कऱ्हांडला बिट परिसरात ठाणा तलावाजवळ कम्पार्टमेंट क्रमांक १४१५ येथील नवेगाव साधू शिवारात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान ही धक्कादायक बाब उजेडात आल्याने माेठीच खळबळ उडाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळी एका गाईच्या वासराची शिकार वाघिणीने केली असून त्यानंतरचा हा प्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती आहे. याप्रकरणाच्या संपूर्ण बाबींचा शोध घेतला जात असून तीन ते चार दिवसापूवीर्ची ही घटना असावी असा कयास सुद्धा लावला जात आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत वन्यजीव आणि वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीला तीन बछडे होते. यापैकी दोन छावे मृतावस्थेत आढळून आले. वाघिणीचा तिसराही छावा मृत पावल्याची भीती व्यक्त केली जात असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आर. बी. गवई यांनी स्पष्ट केले. दरम्यान मृत जनावरावर विषप्रयाेग करूनच वाघांना मारण्यात आल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणात अभयारण्याच्या शेजारीच शेत असलेल्या शेतमालक दिवाकर नागाेकर नामक शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चाैकशी केली जात असल्याचे वनविभागाने सांगितले.
वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दीड महिन्यापूर्वीच दाेन वाघांचा बळी गेला हाेता. वाघांच्या झुंजीत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र यावेळी विषप्रयाेगाने वाघिणीसह तिच्या दाेन बछड्यांच्या मृत प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. दाेन वाघाच्या मृत्यूनंतरही वनविभागाने गांभीर्याने या बाबीकडे लक्ष दिले नाही. वाघिणीची क्षेत्राची लढाई म्हणून अंग काढल्याची टीका केली जात आहे. वाघ शेतापर्यंत आले कसे किंवा जनावर जंगलात गेले कसे, ही बाब तपासण्याची तसदी घेतली नाही. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच काॅलरवाली वाघिण व तिच्या बछड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहेत.
दाेन वर्षात १० वाघांचा बळी
उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात गेल्या दाेन वर्षात १० वाघांचा बळी गेला आहे. वाघ येथे टिकत का नाही, असे म्हटले जात असले तरी ही बाब गंभीर आहे. वाघांसाठी ही डेथ ट्रॅप आहे का, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित हाेत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीमागे घालून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याची टीकाही व्याघ्र प्रेमींनी केली.