सहा वर्षांत दिला २२ पिलांना जन्म : वन विभागाकडून अर्ज सादरसंजय रानडे नागपूरमध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात अधिवास करीत असलेल्या टी-१५ (कॉलरवाली) या वाघिणीची ‘गिनीज बुक’कडे वाटचाल सुरू झाली आहे. या वाघिणीने मागील सहा वर्षांत तब्बल २२ बछड्यांना जन्म देऊन वन्यजीव प्राण्यांमध्ये एक नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे, त्या २२ बछड्यांपैकी ४ बछड्यांचा मृत्यू झाला असून, इतर १८ बछडे आजही जंगलात सुरक्षित अधिवास करीत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या ‘टी-१५’ वाघिणीची विशेष दखल घेऊन, तिची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे (मध्य प्रदेश) क्षेत्र संचालक सुभाषरंजन सेन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. माहिती सूत्रानुसार टी-१५ या वाघिणीने मागील २००८ ते २०१५ या काळात सर्व बछड्यांना जन्म दिला आहे. जाणकारांच्या मते, वन्यप्राण्यांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वाघिणीने एवढ्या बछड्यांना जन्म दिल्याची घटना पुढे आली आहे. मागील २००५ मध्ये याच जंगलातील बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ हिला जन्म दिला होता. यानंतर काहीच दिवसांत ‘टी-१५’ ही पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनली. बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ सह इरत तीन पिलांना जन्म दिला होता. दरम्यान बीबीसीने त्या बडी मादासह सर्व चारही बछड्यांवर ‘स्पाय इन दि जंगल’ नावाचा लघुपट तयार केला होता. यानंतर ‘टी-१५’ या वाघिणीने २००८ मध्ये सर्वप्रथम तीन बछड्यांना जन्म दिला होता. तेव्हा ती केवळ अडीच ते तीन वर्षांची होती. यानंतर ती २५ मे २००८ रोजी सर्वप्रथम आपल्या बछड्यांसह आढळून आली होती. १० आॅक्टोबर २००८ रोजी ती दुसऱ्यांदा चार छोट्या बछड्यांसह दिसली. यापाठोपाठ २०१० मध्ये तिने पुन्हा पाच बछड्यांना जन्म दिला. एका वर्षांत एखाद्या वाघिणीने पाच पिलांना जन्म दिल्याची ही प्रथमच घटना पुढे आली. यानंतर २०१२ मध्ये पुन्हा तीन, २०१३ मध्ये तीन आणि २०१५ मध्ये चार अशाप्रकारे सहा वर्षांत लागोपाठ २२ पिलांना तिने जन्म दिला.
पेंचमधील वाघिणीची ‘गिनीज बुक’ कडे वाटचाल
By admin | Published: October 28, 2015 3:05 AM