प्रकाशपर्वानिमित्त नगरकीर्तन शोभायात्रा नागपूर : दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेतर्फे व समूह संगतच्या सहकार्याने उत्तर नागपुरात भव्य नगरकीर्तन शोभायात्रा काढण्यात आली. यात समूह संगतच्या महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. धर्मरक्षणासाठी आपले सर्वस्व त्यागून महान योद्धा आणि गुरु गोविंदसिंहजी यांचे ३५० वे प्रकाशपर्व संपूर्ण देशात श्रद्धा आणि उत्साहात साजरे करण्यात येत आहे. नागपुरातही गुरु गोविंदसिंहजी यांच्या स्मृतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रकाशपर्व साजरे करण्यात येत आहे. रविवारी नगरकीर्तनाने उत्तर नागपुरातील सर्व गुरुद्वारांना भेट देऊन गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. रविवारी सकाळी गुरुद्वारा सिंह सभेत विशेष अरदास करून गुरुग्रंथ साहिबला फुलांनी सजविलेल्या रथावर ठेवण्यात आले. त्यानंतर नगारे, बँडच्या धुमधडाक्यात नगरकीर्तन रवाना झाले. नगरकीर्तन शोभायात्रा कामठी मार्गाने कडबी चौक, मेकोसाबाग, जरीपटका मुख्य बाजार, कलगीधर सत्संग मंडळ, भीमचौक, पाटणकर चौक, दीपकनगर, बाबा बुड्ढाजीनगर, बुद्धनगर या मार्गाने गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार गुरुनानकपुरा येथे पोहोचली. तेथे अरदासनंतर नगरकीर्तनाचा समारोप झाला. त्यानंतर सर्वांनी लंगरचा आनंद घेतला. नगरकीर्तन शोभायात्रेत सर्वात पुढे नांदेड साहेब येथून आणण्यात आलेले ११ घोडे शोभायात्रेच्या अगदी समोर होते. सोबतच अमृतसर येथून आलेले पाचवे तख्त शिरोमणी अकाली बुढ्ढादलाचे ‘निहंगसिंह’ चालत होते. दलाचे नेतृत्व १५ वे मुखी सिंह साहेब जत्थेदार बाबा प्रेमसिंह करीत होते. मार्गात निहंगसिंह वीरांनी शोभायात्रेच्या मार्गात शस्त्रविद्येचे सादरीकरण केले. यात पट्ट्यांनी लढाई, तलवारबाजीचा समावेश होता. काही सदस्य घोड्यावर बसून नगारा वाजवित होते. शोभायात्रेत शीख संस्कृतीचे दर्शन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) जागोजागी पुष्पवर्षाव नगरकीर्तन शोभायात्रेच्या मार्गात विविध संस्थांनी पुष्पवर्षाव करून शोभायात्रेचे स्वागत केले. मार्गात ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण करण्यात आले. जरीपटका येथे कलगीधर सत्संग मंडळाचे संयोजक अॅड माधवदास ममतानी यांच्या नेतृत्वात सहजधारी संगतने स्वागत केले. गुरु ग्रंथसाहिबला मानणाऱ्या गैरशीख भाविकांना सहजधारी म्हणण्यात येते. ममतानी यांनी सहजधारींना गुरुग्रंथ साहिबाचे दर्शन करवून जरीपटका येथे आणल्याबद्दल संगतचे आभार मानले. त्यानंतर कलगीधर सत्संग मंडळाच्या युवा संगतने छोले-पुरी, पाण्याचे वितरण केले.
‘वाहो गुरु गोविंदसिंहजी’ने उत्तर नागपूर दुमदुमले
By admin | Published: December 26, 2016 2:49 AM