लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : वेकोली उमरेड क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील वायगाव (वेकोली) येथे बऱ्याच वर्षांपासून अशुद्ध पाणीपुरवठा सुरू होता. या समस्यांकडे अनेकदा लक्ष वेधले गेले. अखेरीस वेकोली उमरेड क्षेत्राच्या वतीने आरो प्लांट लावण्यात आले. यामुळे आता वायगाव वेकोलीतील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
सदर आरो प्लांटचे लोकार्पण प्रादेशिक महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच योगीता मानकर, उपसरपंच पंकज गायधने, महाव्यवस्थापक (संचालन) प्रमोद निंबाळकर, प्रादेशिक कार्मिक व्यवस्थापक आर. के. सिंग, सचिव पी. एन. चव्हाण, दीपक सिंग, माजी उपसरपंच दीपू पिल्ले, आदींची उपस्थिती होती. सदर आरो प्लांट सीएसआर योजनेअंतर्गत तयार करण्यात आले असून, प्रतितास एक हजार लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे.
पाच मिनी व्हेंटिलेटर
वेकोली उमरेड क्षेत्राच्या वतीने सीएसआर निधीअंतर्गत कोविड सेंटरसाठी पाच मिनी व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. यामध्ये तीन उमरेड तसेच दोन कुही येथील कोविड सेंटरसाठी देण्यात आले. प्रादेशिक व्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी आमदार राजू पारवे, तहसीलदार प्रमोद कदम, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम, पर्यवेक्षक अनिल पारधी यांच्याकडे सदर साहित्य सोपविले.