प्रकरण मुख्य न्यायमूर्तींपुढे ठेवण्याचे आदेशनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयाच्या एका वरिष्ठ पीठासीन न्यायाधीशाविरुद्ध असंस्कृत आणि आधारहीन आरोप असलेली एका वकिलाची पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रसन्ना वराळे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावतानाच ही तथ्यहीन याचिका दाखल केल्यावरून या वकिलास चांगलेच झापले. अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत कोणतीही योग्यता दिसून आली नाही. या वकिलाचे हे प्रकरण योग्य कारवाईसाठी मुख्य न्यायमूर्ती, महाधिवक्ता आणि बार कौन्सिलच्या अध्यक्षांपुढे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने रजिस्ट्रारला दिले. १६ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने उके यांचा मध्यस्थी अर्ज फेटाळला होता. या आदेशाविरुद्ध उके यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाने या वकिलाच्या अर्जातील आशय व भावार्थावर तीव्र आक्षेप घेतला. सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध बेपर्वा आरोप करून प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने न्यायालयाने उके यांना चांगलेच धारेवर धरले. उच्च न्यायालयाने यापूर्वीही उके यांचा अर्ज फेटाळला होता. हा अर्ज कायद्याच्या अर्धवट ज्ञानावर आधारलेला, कायद्याच्या एकूणच प्रक्रियेचा दुरुपयोग करणारा आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ व्यर्थ घालवणारा असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले होते.(प्रतिनिधी)
तथ्यहीन याचिका दाखल करणाऱ्या वकिलास हायकोर्टाने झापले
By admin | Published: October 17, 2015 3:23 AM