नागपूर : शेक्सपीयर म्हणून गेले नावात काय आहे. पण नाव किती महत्त्वाचे असते, हे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी अनुभवायला आले. नाव नसल्याने गुणवंत विद्यार्थ्यांना अध्यक्षांकडून कौतुकाची थाप मिळू शकली नाही.
जिल्हा परिषदेच्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार होता. विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सकाळी १० पासून जिल्हा परिषदेत पोहचले. सर्वसाधारण सभा असल्याने अध्यक्ष त्यात व्यस्त होते. अध्यक्षांकडून कौतुकाची थाप मिळेल, या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांनी सभा संपेपर्यंत प्रतीक्षा केली.
शिक्षण विभागाने हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात येणार होते. ऑनलाईन सभा संपत येत असताना या सत्काराची माहिती अध्यक्षांना देण्यात आली. त्यांनी स्वीय सहायकांकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सन्मानपत्र मागविले. त्यावर शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे बैठकीतच अध्यक्षांनी सत्काराचा चेंडू सभापतींकडे टोलवला. काहीशा नाराजीच्या सुरात मॅडम तुमच्याच कक्षात सत्कार आटोपून घ्या, असे सभापतींना सांगून कार्यक्रमातून पाय काढून घेतला.
- सत्कारानंतर रकमेच्या मंजुरीसाठी विषय बैठकीत
गुणवंत विद्यार्थ्यांना सत्काराबरोबरच काही रोख रक्कम देण्यात येते. आज सभेच्या दिवशी पुरस्काराच्या ४५ हजार रुपयाच्या रकमेच्या तरतुदीसाठी विषय सर्वसाधारण सभेत आणला. हा विषय शिक्षण समितीत आलाच नाही, असे समिती सदस्य प्रकाश खापरे यांनी सांगितले. समिती सदस्यांना सत्काराची माहितीच नसल्याचेही सदस्यांनी सांगितले.