योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. मात्र महिला मोर्चासह चार ते पाच महत्त्वाच्या मोर्चांची कार्यकारिणी अद्याप घोषित झालेली नाही. निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे अनेकांनी नगरसेवकपदासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कार्यकारिणीवर नियुक्ती व्हावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. परंतु घोषणेला इतका विलंब का लावण्यात येत आहे, असा प्रश्न भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपच्या नागपूर महानगरातील शहर कार्यकारिणी, विविध आघाड्या, मोर्चा व सेलच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. परंतु कार्यकारिणींची घोषणा व्हायची होती. कोरोनाच्या कालावधीत काही मोर्चांच्या कार्यकारिणीची घोषणा झाली. परंतु भाजप महिला मोर्चा, भाजयुमो, अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपटटी, व्यापारी मोर्चा यांच्यासह सेल व मोर्चांच्या कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. अनेक कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. भाजयुमोसह विविध कार्यकारिणींसाठी नावेदेखील निश्चित करण्यात आली आहेत. मात्र तरीदेखील त्याची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. सोशल मीडियावरच नावे फिरत आहेत, मात्र पक्षाने अधिकृत नावे जाहीर न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील संभ्रम आहे. भाजयुमोच्या काही सदस्यांची नावे अशीच समोर आली. मात्र काही नावांवरून कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. महिला मोर्चा, भाजयुमोचे कार्यकर्ते निवडणूकीच्या प्रचारासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे पक्षाने कार्यकारिणी घोषणेसाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षातीलच वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांना संपर्क केला असता लवकरच सर्व कार्यकारिणी पक्षाकडून घोषित होतील. पक्षाच्या प्रक्रियेनुसारच काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंग साधण्याचे नियोजन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूकीतील धक्क्यानंतर भाजपने कमकुवत भागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. नगरसेवक पदाचे तिकीट मोजक्याच लोकांना दिल्या जाऊ शकते. परंतु विविध मोर्चांच्या कार्यकारिणीत सर्वच घटकातील प्रतिनिधींना स्थान देऊन सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. नागपूर मनपा निवडणुकांच्या प्रचाराचे नियोजन डोळ्यासमोर ठेवूनच कार्यकारिणीतील नावे अंतिम करण्यात येत आहेत. स्थान न मिळालेले कार्यकर्ते नाराज होऊ नयेत याचे पक्षासमोर आव्हान राहणार आहे.
.