विजय नागपुरे
कळमेश्वर : तालुक्यातील लोणारा येथील तलावाचा मातीचा बांध फुटल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फुटलेल्या बंधाऱ्याच्या जागी गत २७ वर्षांपासून नवीन सिमेंट बंधारा बांधावा, याकरिता शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. तरीही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कृषी विभागामार्फत लोणारा गावालगत असलेल्या तांबडा गोटा येथे तलावाची निर्मिती करून मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. यामुळे या तलावात पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचत होते. उन्हाळ्यात साचलेले पाणी उपलब्ध राहत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढत होती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघत होता. सोबतच्या तलावाशेजारी वनविभागामार्फत नर्सरीतून जवळपास दोन लाख रोपट्यांची निर्मिती करण्यात येत होती. परंतु, १९९४ ला झालेल्या मुसळधार पावसाने हा बंधारा फुटला. तेव्हापासून हा तलाव सिमेंट बंधाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.
शासन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे बांधत आहे तसेच जल शिवार अंतर्गत नाला खोलीकरण करीत आहे. परंतु, अगोदरच अस्तित्वात असलेल्या तलावांना नवसंजीवनी देण्यासाठी उपाययोजना नाही, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोल जात असून, भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. याकरिता जुन्या तलावांच्या नवनिर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
-
वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
- तलाव गावालगत असून, त्याला लागूनच जंगल परिसर आहे. या तलावावर रात्रीच्या वेळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी यायचे. परंतु, २७ वर्षांपासून या तलावात पाणीच राहत नसल्याने वन्यजीव शेतशिवारात पाण्यासाठी भटकताना दिसतात. ते शेतात पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडीसुद्धा करतात.