लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प उशिरा सादर झाला. सभागृहाच्या मंजुरीनंतर थांबलेली विकास कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत अत्यावश्यक कामे वगळता कोणत्याही नवीन विकास कामांना मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतरच कामांना मंजुरी मिळणार असल्याने बजेट इम्प्लिमेंटसाठी डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी महापालिकेचा सन २०२०-२१ या वर्षाचा २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिकट आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून कार्यादेश झालेल्या विकास कामांना ब्रेक लावले. आठ महिन्यात नगरसेकांना
प्रभागातील अत्यावश्यक सेवेची विकास कामेही करता आली नाही. मुंढे यांची बदली झाल्यानंतर प्रभागातील विकास कामे करता यावी. यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे दिले. या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. अर्थसंकल्प सभागृहाने मंजूर केल्याने विकास कामांना सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता लागल्याने आता डिसेंबर महिन्यात कामांना सुरुवात करता येईल.
३४७ कोटींच्या कामांना ब्रेक
कोविडमुळे जवळपास आठ महिने कामे बंद होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे ३४७ कोटींच्या कामांना ब्रेक लावले होते. मुंढे गेले तरी अजूनही या कामांना मंजुरी मिळाली नाही. अर्थसंकल्प सादर करताना कार्यादेश झालेल्या परंतु निधीअभावी थांबलेल्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. परंतु आचारसंहितेमुळे प्रशासकीय मंजुरीसाठी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आचारसंहितेत प्रशासकीय मान्यता नाही
पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पाणीपुरवठा, कचरा संकलन, आरोग्य यासह अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही प्रकारच्या नविन विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी देता येईल.
राधाकृष्णन बी., आयुक्त मनपा
आचारसंहितेची बाधा नसावी
अर्थसंकल्पात नवीन विकास कामांना मंजुरी दिली आहे. आचारसंहितेपूर्वी मंजुरी दिली असल्याने अशी विकास कामे आचारसंहितेमुळे थांबायला नको. आधीच मागील आठ महिन्यापासून शहरातील विकास कामे ठप्प आहेत. याचा विचार करता अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद असलेली विकास कामे सुरू करावी.
विजय झलके, अध्यक्ष स्थायी समिती